Healthy Tips: हळद हा एक असा मसाला आहे ज्याच्याशिवाय अनेक पदार्थ पूर्णच होऊ शकत नाहीत. रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हळदीचा वापर केला जातो. हळदीची आणखी एक खासियत म्हणजे हळदीचा वापर केवळ पदार्थांना रंग देणं नाही तर अनेक आजारांच्या उपचारांमध्येही हळदी खूप महत्वाची ठरते. यातील औषधी गुणांमुळे हळदीला आयुर्वेदात खूप महत्व आहे. यात भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. मात्र, हळदीचे अनेक फायदे असले तरी याचा अधिक वापर करणं आरोग्यासाठी नुकसानकारकही ठरू शकतं. न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात याबाबत माहिती दिली आहे.
हळदीचे साइड इफेक्ट्स
न्यूट्रिशनिस्टनं सांगितलं की, सोशल मीडियावरील वेगवेगळे व्हिडीओ किंवा पोस्टमध्ये हळदीचे भरपूर फायदे सांगितले जातात. हे पाहून किंवा वाचून लोक हळदीचा भरपूर वापर करू लागतात. मात्र, असं करणं महागात पडू शकतं. हळदीचे फायदे भरपूर आहेत, त्याबाबत शंकाच नाही. पण याचा योग्य प्रमाणात वापर करणं खूप महत्वाचं ठरतं. हळदीच्या जास्त वापरानं अक्यूट हेपाटोटॉक्सिटी होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळं लिव्हर डॅमेज होऊ शकतं. अशात शरीरात काही लक्षणं दिसतात जसे की, डायरिया, पोट खराब होणं, रॅशेज पडणं किंवा ताप येणं. याच कारणानं फायदे आहेत म्हणून हळदीचा जास्त वापर करणं नुकसानकारक ठरू शकतं.
जास्त हळद खाण्याचे नुकसान
हळदीमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण भरपूर असतं, ज्याचा अर्थ जर तुम्ही हळद वेगवेगळ्या माध्यमातून जास्त खात असाल तर किडनी स्टोन तयार होण्यास मदत मिळते. खासकरून अशा लोकांना जास्त धोका असतो ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या आहे किंवा होऊन गेली आहे.
जेवणातील हळदीचं कमी प्रमाण नुकसानकारक नाही. मात्र, जर याचा जास्त वापर केला गेला तर किडनीवर जास्त दबाव पडू शकतो. त्याशिवाय काही रिपोर्ट्स सांगतात की, हळदीचं जास्त प्रमाण आधीच आजारी असलेल्या लोकांमध्ये किडनी फेलिअरचं कारणही ठरू शकतं.
कारण किडनींना शरीरातील अतिरिक्त रसायनं फिल्टर करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे टॉक्सिन वाढू शकतात. हळद किडनीचा आजार, डायबिटीस किंवा ब्लड क्लॉटिंगच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसोबत रिअॅक्ट होऊ शकते.
एमडीपीआय (MDPI) द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, करक्यूमिनचा जास्त डोस नेफ्रोटॉक्सिक इफेक्ट टाकू शकतो आणि रीनल डॅमेज वाढू शकतं. ज्यांना किडनी डिजीज आहे त्यांना याचा धोका अधिक असतो.