Radish Bad Combination : हिवाळ्यात बाजारात वेगवेगळ्या पौष्टिक आणि टेस्टी अशा हिरव्या पालेभाज्या सोबतच कंदमुळंही मिळतात. मूळा हे कंदमूळ त्यातीलच एक. जेवण करताना सलाद म्हणून हिवाळ्यात मूळा खूपजण खातात. महत्वाची बाब म्हणजे या दिवसात मूळा खाण्याचे अनेक फायदेही मिळतात. पण मूळा कोणत्या गोष्टींसोबत खाऊ नये याची माहिती अनेकांना नसते. त्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या होतात. अशात या समस्या होऊ नये म्हणून मूळा कशासोबत खाऊ नये हे आपण पाहणार आहोत.
मूळा ही अशी भाजी आहे जी पचन तंत्र मजबूत बनवते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करते. यात फायबर, व्हिटामिन C, पोटॅशियम, कॅल्शियम आणि अँटी-ऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. नियमित मूळा खाल्ल्याने लिव्हर आणि किडनीची कार्यक्षमता सुधारते. तसेच ब्लड प्रेशरही नियंत्रित राहतं, त्वचा स्वच्छ राहते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. हिवाळ्यात मूळा खाल्ल्यानं शरीराला उष्णता आणि ऊर्जा दोन्ही मिळते.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. प्रताप चौहान यांच्या मते मूळा आरोग्यासाठी अमृतासमान आहे. तो पचनसंस्थेसाठी संजीवनी बूटीसारखे कार्य करतो. मात्र, काही खाद्यपदार्थ मूळ्यासोबत खाल्ले तर ते शरीरासाठी विषासमान ठरू शकतात. आयुर्वेदानुसार काही पदार्थ मूळ्यासोबत खाणे टाळावे, कारण हे पदार्थ एकमेकांच्या विरोधी स्वभावाचे मानले जातात. अशा चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे शरीरात विकार, गॅस, त्वचारोग आणि इतर अनेक तक्रारी उद्भवू शकतात. चला, पाहूया मूळ्यासोबत कोणते पदार्थ खाऊ नयेत.
संत्र्यासोबत मूळा खाऊ नये
मूळा आणि संत्रे हे कॉम्बिनेशन आयुर्वेदानुसार चुकीचं मानलं जातं. मूळा खाल्ल्यानंतर लगेच संत्रे किंवा इतर आंबट फळे खाल्ल्यास पोटात रासायनिक प्रतिक्रिया होते, ज्यामुळे गॅस, अॅसिड रिफ्लक्स आणि जळजळ होऊ शकते. तसेच त्वचारोग आणि सूजही निर्माण होऊ शकते. म्हणून मूळा आणि आंबट फळे खाण्यात किमान १–२ तासांचा अंतर ठेवावं.
कारल्यासोबत मूळा खाऊ नये
मूळा आणि कारले दोन्ही थंड स्वभावाचे असल्याने त्यांचं कॉम्बिनेशन शरीरात टॉक्सिन्स निर्माण करू शकतं. त्यामुळे पोटात गॅस, अपचन, दुखणे आणि इम्यून सिस्टीम कमजोर होण्याची शक्यता असते. म्हणून मूळा आणि कारले कधीही एकत्र खाऊ नयेत.
दूधासोबत मूळा खाऊ नये
मूळा खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्यास शरीरात विषारी घटक तयार होऊ शकतात. हे कॉम्बिनेशन पचनसंस्थेवर परिणाम करून गॅस, अपचन, जडपणा निर्माण करते आणि त्वचेवर पुरळ, चट्टे येऊ शकतात. म्हणून मूळा आणि दूध एकाच वेळी घेणे टाळावे.
मधासोबत मूळा वर्ज्य आहे
मूळा आणि मधाचे मिश्रण शरीरासाठी घातक आहे. या कॉम्बिनेशनमुळे शरीरात टॉक्सिन्स तयार होतात, जे किडनी आणि इतर अवयवांवर परिणाम करू शकतात. तसेच वात आणि कफ वाढवून गॅस, अपचन, ऍलर्जी आणि त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
दह्यासोबत मूळा खाऊ नये
मूळा आणि दही दोन्ही थंड प्रकृतीचे आहेत. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास शरीरात थंडपणा वाढतो आणि अपचन, गॅस, कफ, सर्दी-खोकला, घसा खवखवणे अशा समस्या उद्भवतात. म्हणून मूळा खाल्ल्यानंतर किमान १–२ तासांनीच दही खावे.