Join us

नवरात्र रंग : पिवळ्या रंगाचे कोणते पदार्थ तुम्हाला आवडतात? आठवते का शाळेच्या डब्यातली पिवळी बटाट्याची भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 19:22 IST

नवरात्र स्पेशल : तिसरी माळ- रंग -पिवळा, पिवळ्या रंगाचे कोणते पौष्टिक पदार्थ करता येतील? घ्या यादी..

ठळक मुद्दे(मुगाचे सूप- छायाचित्र सौजन्य- आदिती गाडगीळ तिखे)

भक्ती सोमण-गोखले 

नवरात्राची चौथी माळ. रंग पिवळा.  आपल्या स्वयंपाकघरात पिवळ्या रंगाचे महत्व खूप मोठे आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी फोडणी करताना आपण हळद वापरतोच. त्यामुळे आपला या रंगाशी संबंध रोजचाच. शिवाय तुरडाळ, मूगडाळ, हरभरा अशा विविध डाळीही याच रंगाच्या असतात. त्यामुळे आपला दिवस पिवळ्या रंगाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. वरणापासून पुरण पोळी आणि बटाट्याच्या भाजीपासून बटाटे वड्यांपर्यंत पिवळ्या रंगाची रेलचेल आपल्या घरात असतेच. त्यामुळे नवरात्रात पिवळ्या रंगाचे पदार्थ करणंही तसं सोपं आहे.

पिवळ्या रंगापासून करता येणारे पदार्थ

 बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, मुगाचे सूप, साधं वरण, पिवळा ढोकळा, वडा, फोडणीचा भात, भरली पिवळी सिमला मिर्ची....

(Image : google)

मुगाचे सूप आणि बटाट्याची भाजी

माझी चुलत बहिण आदिती गाडगीळ तिखे ही नियमित पिवळ्या मुगाचे सूप करते. अतिशय चविष्ट आणि पौष्टीक असे हे सूप असते. उकडलेल्या पिवळ्या मुगात तूप, जिरं, तमाल पत्र घालून फोडणी करायची. त्यातच आलं हिरवी मिरची, मीठ, थोडी साखर घालून छान उकळी आणायची आणि वरून कोथींबीर घालून प्यायचे. किंवा नुसत्या भाताबरोबर आमटी पेक्षा हे सूप छान लागते. याशिवाय माझ्या आईच्या पद्धतीची बटाट्याची भाजी नेहमीच करते. नेहमीच्या फोडणीत आलं, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालायच्या. त्यात उकडलेला बटाटा, मीठ, साखर घालून चांगले परतायचे आणि एक वाफ द्यायची. करायला सोपी अशी ही भाजी खाताना हमखास आईची आठवण येतेच. मग तुम्हाला सुचतायत का असे वेगळे पदार्थ!

(लेखिका मुक्त पत्रकार असून, फूड बिझनेस प्रमोशन करणारे Three Cheers हे YouTube चॅनल चालवितात.)

(https://m.youtube.com/channel/UCpBE9TFFIs5m5HjAOpJI-tw)

टॅग्स :अन्नपाककृतीनवरात्री