Join us

Navratri 2025 : कपभर वरीच्या तांदळाचा करा उपवासाचा ढोकळा; मऊसूत-जाळीदार ढोकळ्याची सोपी रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 18:04 IST

Navratri 2025 (Upwasacha Dhokla Kasa Kartat) : हा ढोकळा करायला अतिशय सोपा असून त्याला जास्त वेळ लागत नाही.

नवरात्रीच्या (Navratri 2025) उपवासांसाठी नेहमी तेच ते पदार्थ न करता तुम्ही खमंग असा जाळीदार उपवासाचा ढोकळा घरीच करू शकता. उपवासाचा ढोकळा करायला अगदी सोपा असून कमीत कमी साहित्य लागतं. हा ढोकळा पौष्टिकही असतो.  हा ढोकळा पारंपरिक ढोकळ्यासारखाच मऊ, जाळीदार आणि स्वादिष्ट लागतो, पण तो उपवासाच्या पदार्थांचा वापर करून केलेला असतो. हा ढोकळा करायला अतिशय सोपा असून त्याला जास्त वेळ लागत नाही. विशेष म्हणजे नेहमीच्या ढोकळ्याप्रमाणेच तो पचायलाही हलका असतो.(How To Make Upwas Dhokla)

उपवासाच्या ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य

१ कप भगर 

अर्धा कप साबुदाणा

पाव कप दही (आंबट नसावे)

१ हिरवी मिरची (चवीनुसार)

१ चमचा आलं

अर्धा चमचा जिरे 

१ छोटा चमचा साखर

चवीनुसार मीठ

एक छोटा चमचा इनो किंवा खाण्याचा सोडा

तेल

पाणी

उपवासाच्या ढोकळ्याची सोपी कृती

भगर आणि साबुदाणा वेगवेगळे स्वच्छ धुऊन घ्या. नंतर दोन्ही साधारण ४ ते ५ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

भिजवलेली भगर आणि साबुदाणा एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटताना त्यात आलं,हिरवी मिरची आणि दही घाला. आवश्यक वाटल्यास थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा.

ही पेस्ट जास्त पातळ नसावी. तयार झालेल्या मिश्रणात मीठ आणि साखर घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा.

ढोकळ्यासाठी मिश्रण तयार झाल्यावर, ढोकळ्याचे भांडे गरम करण्यासाठी ठेवा. एका थाळीला तेल लावून ग्रीस करून घ्या. आता ढोकळ्याच्या मिश्रणात इनो किंवा खाण्याचा सोडा घालून हलकेच मिक्स करा.

सोडा घातल्यावर मिश्रण लगेचच फुलू लागते. त्यामुळे सोडा घातल्यानंतर लगेचच तेलाने ग्रीस केलेल्या थाळीमध्ये ओता.

ही थाळी स्टीमरमध्ये ठेवून साधारण १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या. ढोकळा शिजला आहे की नाही, हे बघण्यासाठी सुरी किंवा टूथपिक घालून बघा. ती स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार आहे.

ढोकळा थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. वरून जिरे, हिरवी मिरची, आणि कढीपत्ता वापरून फोडणी देऊ शकता. फोडणी उपवासाला चालत असल्यास ही वापरा. हा गरमागरम ढोकळा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता.  

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.