पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडे रानभाज्या मिळतात. या भाज्या एरवी वर्षभर खायला मिळत नाहीत. त्यामुळे त्या जेव्हा मिळतात तेव्हा पोटभर खाऊन घ्याव्या. कारण त्या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. काही जुनी माणसं असंही म्हणतात की त्या भाज्यांमधून जे काही पौष्टिक घटक मिळतात ते पुढे वर्षभर आपल्या शरीरासाठी उपयोगी ठरतात. त्या भाज्यांपैकीच एक आहे तोंडली. या दिवसांत तोंडले जवळपास सगळीकडेच मिळतात. त्या तोंडल्यांची भाजी कशी करायची याची रेसिपी नव्या पिढीतल्या अनेकांना माहिती नाही. म्हणूनच पाहा ही एक खास रेसिपी (Narali Tondali Recipe by Aishwarya Narkar). अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी तोंडल्याच्या भाजीची पारंपरिक रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(how to make tondlyachi bhaji?)
तोंडल्याची भाजी करण्याची पारंपरिक रेसिपी
ऐश्वर्या नारकर यांनी जी रेसिपी शेअर केली आहे तिला नारळी तोंडली असंही म्हणतात.
साहित्य
१० ते १२ तोंडली
१ मध्यम आकाराचा कांदा
२ ते ३ वाळलेल्या लाल मिरच्या
१ टेबलस्पून नारळाचा किस
अर्धी वाटी नारळाचं दूध
फोडणीसाठी तेल, मोहरी, मिरे आणि दालचिनी, कडिपत्त्याची ५- ६ पाने
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी तोंडल्यांचा मागचा आणि पुढचा भाग काढून घ्या आणि ते उभे चिरून घ्या.
त्यानंतर कढईमध्ये तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर दालचिनी, मोहरी, मीरे, कडिपत्ता, मिरच्या घालून फोडणी करून घ्या.
आता फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो परतून घ्या. कांदा परतून झाल्यानंतर चिरलेली तोंडली घाला आणि ती ही परतून घ्या. मीठ घालून त्यावर १ ते २ मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ येऊ द्या.
यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध आणि किसलेलं नारळ घाला आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ येऊ द्या. तोंडल्याची खमंग भाजी तयार.