Join us

जगातील सगळ्यात महाग तांदूळ, 1 किलोची किंमत वाचून येईल चक्कर; पाहा काय आहे याची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:21 IST

Most Expensive Rice in World: जगातील सर्वात महागडा तांदूळ कोणता? तर अनेकांना उत्तर देताना क्षणभर थांबावं लागेल. चला, या प्रश्नाचं उत्तर पाहूया.

Most Expensive Rice in World: भारतीय घरांमध्ये जेवणात रोज भात खाल्ला जातो. पण असं नाही की, भात केवळ भारतातच खाल्ला जातो. इतरही अनेक देशांमध्ये भात आवडीने खाल्ला जातो. अनेकांचं तर भाताशिवाय जेवणही होत नाही. भारतात तांदळाच्या असंख्य प्रजाती आहेत. भारतात जर कुणाला विचारलं की, सर्वात चांगले तांदूळ कोणते, तर जास्तीत जास्त लोक बासमतीचं नाव घेतील. लांब दाणे, सुंदर सुगंध आणि चवदार पोत यासाठी बासमती जगप्रसिद्ध आहे. पण किंमतीच्या बाबतीत मात्र बासमती फार मागे पडतो. बासमती तांदळाची किंमत साधारण 90 ते 700 रूपये प्रति किलो असते.

भारतामध्ये काही खास प्रजातींच्या तांदळाची किंमत 6,000 ते 7,000 रूपये प्रति किलो इतकी जाऊ शकते, पण जर विचारलं की, जगातील सर्वात महागडा तांदूळ कोणता? तर अनेकांना उत्तर देताना क्षणभर थांबावं लागेल. चला, या प्रश्नाचं उत्तर पाहूया.

जगातील सर्वात महागडा तांदूळ कोणता?

जगातील सर्वात महागडा तांदूळ म्हणजे 'किनमेमाई प्रीमियम' जो जपानमध्ये पिकवला जातो. या तांदळाची किंमत ऐकून कुणालाही धक्का बसेल. हा तांदूळ साधारण 7,000 ते 12,000 प्रति किलो दराने विकला जातो.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

हा प्रीमियम तांदूळ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही जगातील सर्वात महागडा तांदूळ म्हणून नोंदला गेला आहे. जपानमधील Toyo Rice Corporation ही कंपनी या तांदळाचं उत्पादन घेते आणि विकते.

काय विशेष आहे या तांदळात?

जपानमध्ये हा एक लक्झरी फूड आयटम मानला जातो. सामान्य पांढरा तांदूळ पॉलिश करताना त्याचा बाहेरील पोषक थर काढला जातो, ज्यामुळे त्यातील फायबर, पोषक तत्व आणि नैसर्गिक चव नष्ट होते. पण Kinmemai Premium तांदूळ एका विशेष जपानी तंत्रज्ञानाने तयार केला जातो, ज्यामुळे त्यातील फायबर, व्हिटामिन्स आणि नैसर्गिक गोडवा टिकून राहतो. त्याचा प्रत्येक दाणा मऊ, चमकदार आणि हलकी गोडसर चव असलेला असतो. तो शिजवल्यावर त्यातून एक मोहक सुगंध पसरतो आणि प्रत्येक दाणा वेगळा दिसतो.जपानमध्ये हा तांदूळ परंपरा, नवोन्मेष आणि आरोग्याचा संगम मानला जातो.

जपानमध्ये या तांदळाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. लोक तो फक्त अन्न म्हणून नव्हे, तर प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून विकत घेतात. भारताप्रमाणेच जपानमध्येही भाताला 'अन्न देवता' मानलं जातं आणि आदराने हाताळलं जातं. या आदरामुळेच जपानी शेतकऱ्यांनी जगातील सर्वात महागडा तांदूळ तयार करण्याची प्रेरणा घेतली. या तांदळाची आणखी एक खासियत म्हणजे त्याला शिजवण्यापूर्वी धुण्याची गरज नाही, आणि तो सहा महिनेपर्यंत खराब होत नाही.

Kinmemai Premium जगातील सर्वोत्तम कसा ठरला?

साल 2016 मध्ये जपानमध्ये झालेल्या International Rice Testing Competition मध्ये जगभरातील 6,000 पेक्षा जास्त तांदळाच्या प्रजाती प्रदर्शित केल्या गेल्या. त्यामधून विविध निकषांवर तपासणी केल्यानंतर Kinmemai Premium तांदूळ चव, पौष्टिकता आणि पोत या सर्व बाबतीत सर्वोत्तम ठरला. त्या वर्षी त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले.

आरोग्यदायी फायदे

Foodfriend.net या वेबसाईटनुसार, Kinmemai Premium तांदूळ अत्यंत पौष्टिक आहे. यामध्ये व्हिटामिन B1, B6, E, तसेच फोलिक अॅसिड असते. सामान्य तांदळाच्या तुलनेत यात 6 पट अधिक लिपोपॉलिसॅकॅराइड असतात, जे शरीराची इम्यूनिटी वाढवतात आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी करू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : World's Most Expensive Rice: Kinmemai Premium, a Shocking Price!

Web Summary : Japan's Kinmemai Premium rice, costing ₹7,000-₹12,000 per kg, is world's priciest. Known for taste, nutrition, unique processing, it's a luxury item. It won awards and boosts immunity. Doesn't need washing, lasts six months.
टॅग्स :अन्नआरोग्य