अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या रेसिपींना चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळतो. कारण या रेसिपी एवढ्या सहज आणि सोप्या असतात की सर्वसामान्य घरांमध्येही त्या सहज करता येतील.. अशीच भाताची एक सोपी रेसिपी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हवं तर तुम्ही त्याला अगदी सोप्या पद्धतीने केलेला मसाले भातही म्हणू शकता. रात्रीच्या वेळी काहीतरी हलकंफुलकं खाण्याची इच्छा असेल तर ही रेसिपी ट्राय करून पाहा. शिवाय कधी कधी खिचडीला पर्याय म्हणूनही हा भात चांगला आहे.(Actress Aishwarya Narkar Shared Rice Recipe)
ऐश्वर्या नारकर यांनी सांगितलेली भाताची रेसिपी
हा भात करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जेवढे पाहिजे आहेत तेवढे तांदूळ घ्या. ते २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा.
यानंतर गॅसवर एखादं पातेलं किंवा कुकर गरम करायला ठेवा. तुम्ही कढईमध्येही हा भात करू शकता. भांडं गरम झालं की त्यामध्ये आलं, लसूण यांचे तुकडे घालून ते चांगले परतून घ्या. त्यानंतर त्यामध्येच मोहरी, जिरे, हिंग, कडिपत्ता घालून फोडणी करून घ्या.
फोडणी झाल्यानंतर कांदा, टोमॅटो, पत्ताकोबी, बटाटा, फ्लॉवर, मटार अशा तुम्हाला पाहिजे त्या भाज्या बारीक चिरून घ्या आणि त्या ही मस्त परतून घ्या. कोणत्याच भाज्या नसतील तर कांदा आणि टोमॅटो घालूनही हा भात होऊ शकतो.
आता त्यामध्ये भिजवलेले तांदूळ आणि पाणी घाला. तसेच चवीनुसार मीठ, लाल तिखट, मसाला घाला. आणखी छान चव येण्यासाठी तुम्ही त्यात बाजारात विकत मिळणारा बिर्याणी मसालाही घालू शकता. असं सगळं घालून झाल्यानंतर भात चांगला शिजवून घ्या. मस्त चवदार मसालेभात तयार..
