Join us

१ वाटी मुगाचे आप्पे करा; नाश्ता करा पोटभर-प्रोटीनही भरपूर-पाहा झटपट होणारी मस्त रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2024 10:55 IST

moong appe easy healthy recipe for breakfast: रात्री आठवणीने मूग भिजत घातले तर अगदी पटकन होणारा हा पदार्थ

सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा, प्रोटीन रीच आणि हेल्दी हवा हे आपल्या सगळ्यांनाच माहित असते. पण रोज रोज वेगळं, सगळ्यांना आवडेल असं आणि तरीही हेल्दी असं काय करणार असा प्रश्न तमाम महिलांना पडतो. सारखे पोहे, उपमा, खिचडी खाऊन कंटाळाही आलेला असतो. घाईच्या वेळी  झटपट होईल आणि डब्यालाही देता येईल असं काहीतरी करायचं असतं.  मूग हे प्रोटीन, फायबर्स, व्हिटॅमिन्स यांचा उत्तम स्त्रोत असल्याने मूगाचा आहारात समावेश करायला हवा असं आपण वारंवार ऐकतो (moong appe easy healthy recipe for breakfast). 

पण मूग म्हणजे मुगाची उसळ किंवा डोसे या पलिकडे फारसे आपल्याला काही माहित नसते. माहित असले तरी सकाळच्या घाईत आपल्याकडून ते केले जातेच असे नाीही. मात्र हिरव्या मुगाचे गरमागरम आप्पे केले तर? लहान मुलंही हे आप्पे अतिशय आवडीने खातात. यामध्ये भाज्या घातल्या तर मुलांच्या पोटात भाज्या जायलाही मदत होते. रात्री आठवणीने मूग भिजत घातले तर अगदी पटकन होणारा हा पदार्थ फारच वेगळा आणि तरीही चविष्ट होतो. आप्पे म्हणजे आपल्याला डाळ-तांदळाच्या पिठाचे माहित असतात पण हे प्रोटीन पॅक आप्पे नाश्त्याचा एक पौष्टीक पर्याय ठरु शकतात. आधी थोडी तयार असेल तर नाश्त्याला आपण हे आप्पे नक्कीच करु शकतो. पाहूया हे आप्पे नेमके कसे करायचे...

साहित्य -

(Image : Google)

१. हिरवे मूग - १ वाटी 

२. आलं-मिरच-लसूण पेस्ट - १ चमचा 

३. कोबी, गाजर, कांदा, कोथिंबीर - आवडीप्रमाणे 

४. मीठ, साखर - चवीप्रमाणे 

५. लिंबाचा रस - १ चमचा 

कृती -

१. रात्री मूग पाण्यात भिजत घालायचे.

२. सकाळी मूग आणि आलं-मिरची लसूण एकत्र वाटून घ्यायचे.

(Image : Google)

३. यामध्ये मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालायचा. 

४. अंदाज घेऊन थोडे पाणी घालून पीठ एकजीव करायचे.

५. आवडीप्रमाणे भाज्या किसून घालायच्या.

६. पीठ १५-२० मिनीटे झाकून ठेवायचे 

७. आप्पे पात्रात तेल घालून आप्पे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यायचे. 

८. गरमागरम आप्पे सॉस, चटणी, दही कशासोबतही छान लागतात.

टॅग्स :अन्नआहार योजनापाककृती