पावसाळ्यात मस्त पनीर पकोडा खायची मज्जाच काही और आहे. पण हा पकोडा घरी करताना कायम फुटतो का? पनीरचा तुकडा वेगळा आणि पीठ वेगळे राहते. तसेच व्यवस्थित तळले जात नाही आणि फारच तेलकट होतात? (Monsoon Special: Do paneer pakodas burst while frying? Make them 'this way', delicious and crispy recipe, )एकदा ही रेसिपी करुन पाहा. सोप्या काही टिप्स लक्षात ठेवा म्हणजे असे काहीच होणार नाही. पनीर छान खमंग तळलेही जाईल आणि फुटणारही नाही. पाहा कसे करायचे पनीर पकोडे.
साहित्य
पनीर, बेसन, तांदूळाचे पीठ, मैदा, मीठ, हळद, धणे पूड, जिरे पूड, पाणी, तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर
कृती
१. पनीरचे चौकोनी काप करायचे. मध्यम आकाराचे तुकडे करायचे. जे तळताना त्रास होणार नाही. जास्त मोठे ठेवले तर ते फुटतात तसेच जास्त लहान ठेवले तर ते चिवट होतात. त्यामुळे मध्यम आकाराचे तुकडे घ्यायचे. हिरवी मिरची वाटून घ्यायची. तसेच ताजी छान कोथिंबीर निवडायची. निवडून झाल्यावर धुवायची आणि मग बारीक चिरायची.
२. एका खोलग पातेल्यात थोडे बेसन घ्यायचे. वाटीभर बेसन घेतले तर अर्धी वाटी तांदूळाचे पीठ घ्यायचे. त्यात थोडा मैदा घालायचा. सगळी पिठं एकजीव करायची आणि मग त्यात चवी पुरते मीठ घालायचे. तसेच चमचाभर हळद घालायची आणि चमचाभर लाल तिखट घालायचे. व्यवस्थित मिक्स करुन घ्यायचे. नंतर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. चमचाभर जिरे पूड घालायची आणि चमचाभर धणे पूड घालायची. मिश्रण छान ढवळून घ्यायचे.
३. पीठ व्यवस्थित एकजीव करायचे आणि मग त्यात पाणी घालून भजीसाठी जसे पीठ तयार करता तसेच पीठ करायचे. जास्त पातळ नको आणि घट्टही नको. चमच्याने पडेल असे करायचे. त्यात थोडे गरम तेल घालायचे. ढवळायचे आणि तेल पीठात एकजीव करुन घ्यायचे.
४. गॅसवर तेल गरम करत ठेवायचे. तेल मध्यम गरम झाल्यावर भजी तळायला घ्यायची. पनीरचे तुकडे पिठात बुडवायचे आणि मग ते छान खमंग तळायचे. कमी गॅस ठेवा. मंद आचेवर छान तळायचे म्हणजे जळत नाहीत. सगळे असेच छान तळायचे. पीठ जरा घट्ट आणि पनीर मध्यम आकाराचे घेतल्यावर पकोडा फुटत नाही. गॅस मध्यम ठेवायचा आणि सतत ढवळायचे नाही. एकदाच झाऱ्याने भजी ढवळायची. सतत झाला लावला तर पनीर फुटते.