कोशिंबीर करायची म्हणजे काकडी किंवा टोमॅटो घ्यायचे आणि थोडासा दाण्याचा कुट, थोडे दही घालून कोशिंबीर करायची, हे आपल्या अगदीच अंगवळणी पडलेले असते. पण यात जर थोडा ट्विस्ट केला आणि एक- दोन पदार्थ घालून काेशिंबीर करण्यापेक्षा जर सगळेच सॅलड आणि बऱ्याचशा भाज्या घालून मिक्सव्हेज कॉकटेल कोशिंबीर केली, तर जेवणारे नक्कीच खुश होऊन जातात आणि पुन्हा पुन्हा ही कोशिंबीर आवडीने मागून खातात.
कोशिंबीर खाण्याचे फायदेकोशिंबीर हा पदार्थच असा असतो की ज्यामुळे जेवणाची रंगत वाढत जाते. कोशिंबीरीमध्ये असणारे सगळे पदार्थ आपण कच्चे खात असतो. त्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणावर फायबर मिळत असल्याने कोशिंबीर खाणे विशेष आरोग्यदायी मानले जाते. याशिवाय कोशिंबीरीमध्ये असणाऱ्या दह्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया नीट होऊन पचनसंस्था मजबूत होत जाते. त्यामुळे पचनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीही थोड्या प्रमाणात का होईना पण कोशिंबीर नियमितपणे खावी.
मिक्सव्हेज कॉकटेल कोशिंबीरीसाठी लागणारे साहित्यकाकडी, कांदा, टोमॅटो, गाजर, बीट, पत्ताकोबी, मेथी, पुदिना, सिमला मिरची, स्वीटकॉर्नचे उकडून घेतलेले दाणे, डाळिंबाचे दाणे, चाट मसाला, काळे मीठ, साधे मीठ, थोडीशी साखर, घट्ट आणि फेटलेले दही.
मिक्सव्हेज कॉकटेल कोशिंबीरीची रेसिपीमिक्सव्हेज कॉकटेल कोशिंबीर करण्याची रेसिपी अतिशय सोपी आहे. यासाठी आपण ज्या काही भाज्या, सॅलड घेतले आहेत, त्या सगळ्या छोट्या छोट्या चौकोनी आकारात चिरून घ्याव्यात. यातील कोणतीही भाजी किसून घेऊ नये. आपल्याला खूप सारे पदार्थ घ्यायचे असल्यामुळे प्रत्येक पदार्थाचे प्रमाण कमी- कमी घ्यावे. चिरून घेतलेले सगळे पदार्थ एका बाऊलमध्ये टाकावेत. यामध्ये स्वीटकॉर्नचे उकडलेले दाणे आणि डाळिंबाचे दाणे टाकावेत.
थोडा चाट मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि थोडेसे काळेमीठ असे सगळे टाकून ते हलवून घ्यावे. सगळ्यात शेवटी जेवायला बसण्याच्या आधी घट्ट आणि फेटलेले दही टाकावे आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. ही कोशिंबीर करताना वरतून हिंग मोहरीची फोडणी घालण्याची काहीही गरज नाही. दही आणि बीटरूटमुळे सगळ्या कोशिंबीरीला हलकासा गुलाबी रंग येतो. त्यामुळे अशी ही बेबीपिंक कलरची कोशिंबीर नेत्रसुख तर देतेच पण रसनेला तृप्तही करते आणि आरोग्याची काळजीही घेते.