Join us

परफेक्ट ढाबास्टाइल मेथी मटर मलाई पनीर करण्याची सोपी रेसिपी, हिवाळ्यात खायलाच हवी चमचमीत भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2024 17:13 IST

Methi matar malai paneer sabji recipe : ताटात एखादी छानशी वेगळी भाजी असेल तर नेहमीपेक्षा ४ घास जास्तच खाल्ले जातात.

थंडीच्या दिवसांत बाजारात भरपूर भाज्या येतात. तसंच आपलीही भूक वाढलेली असते आणि खाल्लेले चांगले पचते त्यामुळे आपल्याला वेगवेगळे, चमचमीत काहीतरी खावेसे वाटते. सतत तीच ती भाजीपोळी खाऊन अनेकदा आपल्याला कंटाळा आलेला असतो. अशावेळी ताटात एखादी छानशी वेगळी भाजी असेल तर नेहमीपेक्षा ४ घास जास्तच खाल्ले जातात. हॉटेलमध्ये गेलो की आपण ग्रेव्हीच्या वेगवेगळ्या भाज्या ऑर्डर करतो. या भाज्या खाऊन आपल्याला बरे वाटते. पण अशाच भाज्या आपण घरीही करु शकतो. कमीत कमी वेळात आणि कष्टात या भाज्या करण्यासाठी त्याची रेसिपी समजून घ्यायला हवी. पाहूयात ढाबास्टाईल किंवा हॉटेलस्टाईल मेथी मटार मलाई पनीरची भाजी घरी कशी करायची Methi matar malai paneer sabji recipe...

१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये पनीरचे तुकडे चांगले फ्राय करुन घ्यायचे. 

२. त्याच तेलात २ तमालपत्र, १ इंचाचा दालचिनीचा तुकडा, ४ लवंग, ८ ते १० काळी मिरी, २ वेलची, आलं, लसूण आणि मिरची घालून ते चांगले परतून घ्यायचे.

(Image : Google)

३. यामध्ये उभा चिरलेला कांदा, भिजवलेले काजू आणि  मीठ घालून वाफ आणण्यासाठी कढईवर झाकण ठेवायचे. 

४. कांदा चांगला मऊ होईपर्यंत झाकण ठेवून ५ मिनीटे चांगली वाफ येऊ द्यायची.

५.  गार झाल्यावर हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करुन घ्यायची. 

६. कढईमध्ये बटर घालून त्यात जीरे घालायचे आणि धुवून बारीक चिरलेली मेथी परतून घ्यायची, मग मटार घालायचे. 

७. मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घालून सगळे चांगले एकजीव करायचे. 

८. थोडीशी हळद आणि अंदाजे पाणी घालून हे सगळे चांगले शिजू द्यायचे. 

९. शेवटी यामध्ये मीठ, गरम मसाला, तळलेले पनीर, क्रिम आणि कोथिंबीर घालायची. 

१०. सगळे चांगले एकजीव करुन पुन्हा २ मिनीटांसाठी वाफ घ्यायची आणि गॅस बंद करायचा. 

११. ही भाजी रोटी, नान किंवा गरम पोळीसोबतही छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.