आजकाल लोणी विकत मिळते. छान असते त्यात काही वाद नाही. डेअरीमध्ये जाऊन ताजे लोणीही घेता येते. मात्र घरच्या लोण्याची सर विकतच्या लोण्याला येऊच शकत नाही. (Makhan recipe, Add this ingredient while making White butter, a special tip , homemade butter )घरच्या लोण्याचे कढवलेले तूप वासावरुनच ओळखता येते. भाकरी , पराठा, थालीपीठ अशा पदार्थांसोबत मस्त मऊ असे लोणी असेल तर जेवणाची मज्जाच वेगळी असते. लोणी, तूप हे पदार्थ चवीला, वासाला, रंगाला चांगले असतील तरच खावेसे वाटतात. त्यामुळे घरी अगदी मस्त लोणी काढण्यासाठी काही टिप्स पाहा. आपण म्हणताना लोण्याचा गोळा असे म्हणतो, मात्र अनेकदा लोण्याचा गोळा होतच नाही तुटक असे कण तयार होतात. ज्यामुळे लोणी अख्खे, मऊ, एकजीव असे होत नाही.
लोणी काढताना काही गोष्टींची काळजी घेतली की लोणी नक्की छान लागते. लोणी येईपर्यंत घुसळण्याची क्रिया करणे जरा कष्टाचे आहे मात्र ते व्यवस्थित केले की लोणी नक्कीच छान होते. सगळ्यात आधी दुधाची साय काढून ठेवताना ताजी साय काढायची. दूध बरेचदा उकळल्यावर नंतर त्याची साय फार उशीरा काढून ठेवली असे करायचे नाही. दिवसा सकाळी आणि संध्याकाळी दूध उकळायचे आणि त्याची साय साठवायची. सायीचे भांडे फ्रिजमध्ये ठेवायचे. भरपूर साय जमवायची. म्हशीच्या दुधाची साय जास्त छान आणि घट्ट जमते. त्याचे लोणी जास्त चविष्ट होते.
साय फ्रिजमधून काढायची आणि ती थोडावेळ ठेऊन द्यायची. तापमान नॉर्मलला आले की एका पातेल्यात साय घ्यायची आणि तापवायची. जास्त तापवायची गरज नाही. फक्त साय गरम झाली की ढवळून पाहा आणि गॅसवरुन उतरवा. त्यात चमचाभर छान ताजे दही घालायचे आणि ढवळून घ्यायचे. ढवळून झाल्यावर किमान सात ते आठ तासांसाठी साय तशीच झाकून ठेवायची. सात आठ तासांनी साय घट्ट झाली असेल. ती एका वेगळ्या खोलगट भांड्यात काढून घ्यायची. नंतर थोडावेळ रवीने म्हणजेच घुसळणीने साय घुसळून घ्यायची. जरा मोकळी आणि मऊ होईल. त्यात लोण्याचे कण दिसतील. असे झाल्यावर त्यात गार पाणी घालायचे. त्यात थोडा बर्फ घालायचा. बर्फामुळे लोणी खुप छान तयार होते.
लोणी आणि ताक वेगळे व्हायला लागल्यावर हाताने लोणी काढून घ्यायचे. त्याचा गोळा करायचा आणि स्वच्छ थंड पाण्यात ठेवायचा. त्यामुळे लोण्यातील अतिरिक्त ताक निघून जाईल. मग हाताने लोणी छान गोल करुन घ्यायचे. फ्रिजमध्ये अनेक दिवस चांगले राहते.