Join us

टमाट्याची भाजी चटणी नेहमीच खाता, करा टमाट्याचं लोणचं.. झटपट आणि चटकदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 10:15 IST

टमाट्याची भाजी, चटणी यापेक्षा वेगळा आणि चटकदार प्रकार म्हणजे टमाट्याचं लोणचं (tomato pickle) . हे झटपट लोणचं टिकतंही!

ठळक मुद्देटमाट्याच्या लोणच्यासाठी मीठ, तिखट, लसूण, जिरे ही सामग्री ही विशिष्ट प्रमाणात न घेता  आपल्या चवीनुसार घ्यावी. 

लोणचं हे फक्त कैरीचं आणि लिंबाचंच केलं जातं असं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे (pickle) तयार केले जातात. त्यात झटपट लोणच्याचेही अनेक प्रकार असतात. टमाट्याची भाजी, चटणी, सार , कोशिंबीर हे प्रकार आपण नेहेमीच खातो पण टमाट्याचं झटपट लोणचंही (tomato pickle) तयार करता येतं, हे माहीत आहे का? टमाट्याचं लोणचं झटक्यात तयार होतं आणि चटकदारही लागतं.  टमाट्याचं लोणचं बराच काळ टिकतंही. दक्षिण भारतात टमाट्याच्या लोणच्याला गोज्जू असं म्हणतात.  टमाट्याचं हे झटपट लोणचं तयार करण्यासाठी सामग्री आणि कृतीचा फार काही आटापिटा करावा लागत नाही.  जेवणची चव वाढवणाऱ्या टमाट्याच्या झटपट लोणच्याची रेसिपी (how to make tomato pickle) अगदीच सोपी आहे.  

Image: Google

कसं करायचं टमाट्याचं झटपट लोणचं?

टमाट्याचं झटपट लोणचं तयार करण्यासाठी 2 टमाटे, थोडं तेल,  लाल तिखट, शेंगदाणे, जीरे, मीठ, लसूण, मोहरी, मेथ्या आणि  3 छोटे चमचे साखर घ्यावी. टमाट्याचं लोणचं तयार करताना आधी कढई गरम करुन घ्यावी. कढईत मेथ्या टाकून त्या कोरड्याच भाजून घ्याव्यात. मेथ्या थंडं झाल्या की त्यात मोहरी घालावी.  मेथ्या आणि मोहरी एकत्र करुन मिक्सरमधून बारीक वाटून त्याची पावडर करुन घ्यावी. नंतर कढईत थोडं तेल घालावं. तेल गरम झालं की टमाट्याचे मोठे मोठे कापलेले तुकडे तेलात घालून ते चांगले परतून घ्यावेत.  टमाटे परतले गेले की त्यात साखर घालावी.

Image: Google

साखर विरघळेपर्यत टमाटे परतावे. साखर विरघळली की त्यात चवीनुसार मीठ आणि इतर सर्व सामग्री घालून हे सर्व नीट मिसळून घ्यावं. सर्व सामग्री नीट मिसळली गेली की त्यात मेथ्या मोहरीची पावडर घालावी. वरुन लाल तिखट घालून ते नीट मिसळून घ्यावं.  गॅस बंद करावा. मिश्रण गार होवू द्यावं. हे लोणचं हवाबंद बरणीत भरुन ठेवावं. ही बरणी फ्रिजमध्ये ठेवावी. भाजी करण्याचा किंवा खाण्याचा कंटाळा आला तर टमाट्याचं हे झटपट चटकदार लोणचं छान लागतं. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती