बिस्कीट हा पदार्थ लहान मुले फार आवडीने खातात. मात्र बिस्कीटांमुळे वजन तर वाढतेच आणि पचनालाही त्रास होतो. (Make delicious, crunchy biscuits at home now, no oven needed and no flour needed, recipe for kids)त्यातील मैदा आणि वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली नाही. घरी विकतपेक्षा मस्त बिस्कीट करता येतात. ते ही मैदा न वापरता. लहान मुलांना आवडतीलही आणि आरोग्याला काही त्रास होणार नाही.
साहित्य
गव्हाचे पीठ, पिठीसाखर, तूप, बेकींग पावडर, बेकींग सोडा, व्हॅनिला इसेंस, दूध ,बेकींग पेपर , मीठ
कृती
१. एका खोलगट पातेल्यात वितळवलेले तूप घ्यायचे. जर वाटीभर कणकेची बिस्कीटं करायची असतील तर त्यासाठी अर्धी वाटी तूप घ्यायचे. तूप जास्त घेतल्यावर मस्त खुसखुशीत बिस्कीट करता येईल. तुपात पिठीसाखर घालायची आणि व्यवस्थित फेटायचे. छान एकजीव करायचे. तूप आणि साखर एकत्र झाल्यावर त्यात थोडीशी बेकींग पावडर घालायची आणि तेवढाच बेकींग सोडाही घालायचा. व्हॅनिला इसेंसचे काही थेंब घालायचे. सगळं ढवळून घ्यायचं.
२. सगळे पदार्थ छान ढवळून आणि फेटून झाल्यावर त्यात कणिक घालायची. व्यवस्थित एकजूव करायचे. थोडे थोडे दूध घालायचे आणि पीठ मळायचे. मस्त मऊ असे पीठ मळून घ्यायचे. त्याला आकार देता येईल एवढे घट्ट ठेवायचे. म्हणजे बिस्कीट छान गोल होतील आणि खुसखुशीत होतील. पीठ जास्त सैल झाले तर बिस्कीटाला आकार चांगला येणार नाही आणि ती मऊ पडतील. पीठ मळण्यासाठी फक्त दूधच घ्यायचे. पाणी वापरु नका.
३. पीठाला गोल आकार द्यायचा. मस्त बिस्कीट तयार करुन घ्यायचे. जरा जाडच ठेवायचे. एकदम पातळ नको. एका कढईत किंवा कुकरमध्ये खाली भरपूर मीठ पसरवायचे. त्यावर उलटी ताटली किंवा कुकरमध्ये वापरला जाणारा स्टॅण्ड ठेवायचा. झाकण ठेवायचे कढई किंवा कुकर झाकून त्यातील मीठ जरा गरम करायचे. गॅस मंदच ठेवायचा. मीठ जरा कोमट झाल्यावर झाकण काढायचे. एका ताटलीत बेकींग पेपर ठेवायचा. त्यावर तयार केलेली बिस्कीट ठेवायची. ताटली मीठावर ठेवायची. स्टॅण्डऐवजी जर ताटली वापरत असाल तर ती जरा उंच वापरा. म्हणजे मीठ बिस्कीटाला लागणार नाही. सगळीकडून झाकले जाईल असे झाकण ठेवा. कुकर वापरत असाल तर ताटली ठेवा. कुकरचे झाकण लाऊ नका. वीस मिनिटांनी एकदा बिस्कीट झाले की नाही ते तपासून पाहा. नसेल झाले तर आणखी थोडावेळ ठेवा. मस्त खमंग बिस्कीट तयार होतात.