Join us

झटपट करा कुठलीही झणझणीत मसाल्याची तर्रीवाली भाजी, वाटणाच्या २ कृती- भोपळा-दोडकाही लागेल चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 16:19 IST

Make any spicy vegetable stir-fry in no time, 2 recipes for Vatan : भाजी झटपट होईल. फक्त असे वाटण तयार करुन ठेवायचे.

भाजी छान चटपटीत व्हावी यासाठी आपण त्यात विविध पदार्थ घालतो. मसाले घालतो. भाजी चटणीची चव वाढवण्यासाठी या दोन रेसिपी अगदी फायद्याच्या ठरतील. (Make any spicy vegetable stir-fry in no time, 2 recipes for Vatan)एक वाटण छान पांढरे आहे तर दुसरे मस्त हिरवे. चवीला दोन्ही अगदी वेगळे आणि भारी. भाजी सुकी करायची असेल तरी ही वाटणं वापरु शकता तसेच रस्सा भाजी आणि आमटीसाठीही चांगली आहेत. सात ते आठ दिवस टिकतात. आणि पटकन करता येतात.   

साहित्य सुकं खोबरं, पांढरे तीळ, शेंगदाणे, कडीपत्ता, जिरे, मीठ, धणे 

कृती१. शेंगदाणे भाजून घ्यायचे. छान कुरकुरीत झाल्यावर गॅसवरुन काढून घ्यायचे आणि त्याची साले काढून टाकायची. इतर पदार्थांपेक्षा शेंगदाणे जास्त घ्यायचे. शेंगदाणे गार करत ठेवायचे. 

२. पांढरे तीळ जरा परतून घ्यायचे. अगदी दोन मिनिटे परतायचे. जास्त नाही. सुकं खोबरंही परतायचं. सगळे पदार्थ परतून झाल्यावर गार करत ठेवायचे. गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्यात कडीपत्याची ताजी पाने घालायची. दोन चमचे जिरे घालायचे. तसेच चमचाभर धणे घालायचे आणि मीठ घालायचे. 

३. सगळे पदार्थ छान वाटून घ्यायचे. त्याची पावडर तयार करायची. वाटण कोरडेच ठेवायचे. वापरताना दोन ते तीन चमचे भाजीत घालायचे. चवीला अगदी छान लागते. सुकी भाजी आणि ओली भाजी दोन्हीसाठी वापरु शकता.      

साहित्य शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची, जिरं, डाळं, मीठ, तेल  

कृती१. एका कढईमध्ये शेंगदाणे परतून घ्यायचे. शेंगदाणे परतल्यावर त्याची सालं काढून टाकायची. नंतर कढईत थोडे तेल घ्यायचे आणि त्यात चमचाभर जिरं घालायचे. त्यात लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. थोडं डाळं घालायचं. आल्याचा तुकडा घालायचा. 

२. सगळं छान परतून झाल्यावर त्यात चवी पुरते मीठ घालायचे आणि  कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी परतायची. मग गॅस बंद करा आणि वाटण गार होऊ द्या. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि वाटून घ्यायचे. भाजीत घाला किंवा चटणीत घाला चवीला मस्त लागेल.       

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.