Join us

घरात ज्वारीचं पीठ आणि कोबी असेल तर करा कोबी ज्वारीचे मुटके; संध्याकाळचा सुटी स्पेशल नाश्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 19:36 IST

मुलांना जर चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर गुजराती प्रकारचे चटपटीत ज्वारीचे मुटके सहज करता येतात.

ठळक मुद्देमुटक्यांसाठी कणिक, बेसनपीठ आणि ज्वारीचं पीठ असे तीन प्रकारचे पीठ लागतात. पाणी बेतानं घालून पीठ भिजवावं.मुटक्यासांठीचे रोल 25-30 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यावेत. 

मुलांच्या सुट्या म्हणजे स्पेशल काहीतरीची हमखास फर्माईश. ही फर्माईश केवळ जेवणापुरतीच नसते तर मुलांना मधल्या वेळेत देखील वेगळं, स्पेशल काहीतरी खायचं असतं. स्पेशल करायचं म्हणजे अवघड पदार्थांच्या वाट्याला जायचं असं नाही. तर घरात उपलब्ध असलेल्या नेहमीच्या जिन्नसातूनही मुलांच्या आग्रहाचं स्पेशल काहीतरी करता येतं. घरात  ज्वारीचं पीठ आणि कोबी असेल आणि मुलांना जर चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर गुजराती प्रकारचे चटपटीत ज्वारीचे मुटके सहज करता येतात. 

Image: Google

ज्वारीचे मुटके कसे करणार?

ज्वारीचे मुटके करण्यासाठी  2 कप बारीक किसलेला कोबी,1 कप गव्हाचं पीठ, 1 कप ज्वारीचं पीठ, 1 कप बेसनपीठ, 2 हिरव्या मिरच्या, 2 इंच आल्याचा तुकडा, मीठ,  अर्धा चमचा सोडा, 2 मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, आवश्यकतेनुसार तेल, 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा मोहरी आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घ्यावीत. 

Image: Google

ज्वारीचे मुटके करताना आधी कोबी  धुवून बारीक किसून घ्यावा. किसलेला कोबी बाजूला ठेवावा. हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी. आलं मिरची बारीक वाटून घ्यावी.  एका मोठ्या भांड्यात कणिक, बेसनपीठ आणि ज्वारीचं पीठ चाऊन घ्यावं.पिठं एकत्र करुन घ्यावी. पिठात किसलेला कोबी घालावा. यात चवीप्रमाणे मीठ घालावं. मिश्रण मऊ मळून घ्याव. मिश्रणात बेतानंच पाणी घालावं. मिश्रण मळून झालं की ते 10मिनिटं बाजूला ठेवावं. पीठ थोडं मुरलं की त्याचे छोटे गोळे घेऊन ते लंबाकार वळून घ्यावेत. रोळीला तेलाचा हात लावून वळलेले रोल 25-30मिनिटं मध्यम आचेवर वाफवून घ्यावेत. वाफवलेले रोल  बाहेर काढून घ्यावेत. ते थंड झाले की त्याचे  मध्यम आकाराचे गोलाकार तुकडे करावेत .

Image: Google

कढईत थोडं तेल घ्यावं. तेल गरम होवू द्यावं. तेल गरम झालं की मोहरी, जिरे, तीळ, कढी पत्ता आणि हिंगाची फोडणी द्यावी. फोडणीत मुटके घालून ते परतावेत. मध्यम आचेवर मुटके परतताना त्यावर लिंबाचा रस् घालावा. शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. कोबी ज्वारीचे मुटके पुदिन्याच्या हिरव्या चटपटीत चटणीसोबत छान लागतात. मुटके गरम गरम खावेत. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती