Join us

उपवास स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम, उपवास करू स्पेशल आणि पौष्टिक - खा पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2023 19:28 IST

Mahashivratri Special Sweet Potato Gulab Jamun Recipe उपवासाला गोड काय करायचे असा प्रश्न पडला असेल तर ही घ्या खास रेसिपी

उपवासाला अनेक पदार्थ बनवले जातात. साबुदाणा, भगर आणि बटाट्यापासून तयार पदार्थ आपण उपवासाला खातोच. या महाशिवरात्रीला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, रताळ्याचे गुलाबजाम ही रेसिपी ट्राय करून पाहा. रताळ्यांपासून शरीराला अनेक फायदे मिळतात. रताळ्याला कंदमुळ असेही म्हणतात.

रताळ्याच्या गडद रंगात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटामिन ए, कॅरोटीनोइड्स जास्त प्रमाणात आढळतात. १०० ग्रॅम रताळ्यामध्ये ४००  टक्क्यांपेक्षा जास्त जीवनसत्व आढळतात. ज्यामुळे याचा फायदा आपल्या शरीराला होतो. रताळे आपण सहसा फक्त उकडून खातो. मात्र, उकडून न खाता, त्याचे गोल गोल गुलाबजाम बनवा. लहानग्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला ही डिश नक्कीच आवडेल. चला तर मग या पदार्थाची कृती पाहूयात.

रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य

रताळी

साखर दीड वाटी

तळण्यासाठी तूप

शिंगाडे पीठ

साबुदाणा पीठ

वेलची पूड

कृती

सर्वप्रथम, रताळी चांगली उकडून सोलून घ्या. उकडल्यानंतर रताळे चांगले कुस्करून घ्या. त्यानंतर त्यात दोन चमचे शिंगाडे पीठ, साबुदाणा पीठ घालून मिश्रण मळून घ्या. या मिश्रणात वेलची पूड अथवा अख्खी वेलची घाला. पीठ तयार झाल्यानंतर त्याचे लहान गोळे करून घ्या.

दुसरीकडे एका कढईत तेल अथवा तूप गरम करत ठेवा. त्यात गुलाबजामचे गोळे तळून घ्या. सोनेरी रंग येऊपर्यंत चांगले तळून घ्या. तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये गुलाबजाम काढून घ्या.

आता साखरेचा एकतारी पाक करून घ्या. ज्याप्रमाणे गुलाबजामसाठी आपण पाक तयार करतो. त्याच प्रमाणे पाक तयार करा. त्यात हे गुलाबजामचे गोळे सोडा. शेवटी या पाकात दोन चमचे गुलाबपाणी घाला, यासह सुक्या मेव्याचे बारीक तुकडे पेरा. थोडा वेळ गुलाबजाम पाकात भिजत राहू द्यावे. त्यानंतर या गुलाबजामचा आस्वाद घ्या. 

टॅग्स :महाशिवरात्रीकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न