चटपटीत, चमचमीत गोष्टी म्हटल्यावर डोळ्यासमोर फास्ट फूड, जंक फूड येतं, पण काही पारंपरिक रेसेपी करायला सोप्या आणि खायलाही रुचकर असतात. सोशल मीडियामुळे रेसेपी बुक न उघडताही काही मिनिटात ठिकठिकाणच्या नवनव्या रेसेपी घरबसल्या शिकायला मिळतात. बिहारची बिष्टी अशाच झारखंडच्या पारंपरिक रेसेपी शिकवते. त्यातच ही परवलाच्या भरताची रेसेपी सापडली. एरव्ही आपण फक्त भाजी करतो, पण नवं काही ट्राय करता आलं तर उत्तम. जोडीला तिने केलेल्या नाचणीच्या भाकऱ्या पाहता, हा बेत उत्तम जमू शकेल आणि घरच्यांनाही आवडू शकेल. पावसाळ्यात नेहमी भजीच केली पाहिजे असे नाही, कधी कधी असे पदार्थही जेवणाची लज्जत वाढवतात. ट्राय करा पुढील रेसेपी.
साहित्य-
परवल- ३०० ग्रॅम, तेल- १ टेबलस्पून, सुक्या लाल मिरच्या-३, लसूण-१५, टोमॅटो- २, चवीनुसार मीठ, कांदा-२, हिरव्या मिरच्या-१, बारीक चिरलेली कोथिंबीर. लिंबाचा रस - १ टीस्पून, काळे मीठ- १ टीस्पून,
नाचणीच्या भाकरीसाठी :-
पाणी- १ कप, मीठ- १/२ टीस्पून, तेल - १ टीस्पून, नाचणी पीठ- १ कप, बिया (फ्लेक्स सीड, भोपळ्याचे बी, सूर्यफूल बी) मिसळा, तूप (पर्यायी)
कृती :
>> परवल धुवून त्याचे हलके साल काढून घ्या. प्रत्येकी दोन तुकडे करून घ्या.
>> पॅन मध्ये १ तेल चमचा, लाल मिरची चुरून घ्या, त्यातच लसूण, परवल आणि टोमॅटो चिरून टाका आणि मीठ घाला.
>> एकीकडे एक कप पाण्यात मीठ आणि तेल घालून पाणी उकळल्यावर एक कप नाचणी पीठ घाला, लाटण्याने ढवळून घ्या आणि झाकून ठेवा.
>> परवल आणि टोमॅटो दुसऱ्या बाजूने शेकून घ्या आणि एक वाफ काढा.
>> टोमॅटोचे साल काढून घ्या आणि पॅन मधील मिश्रण पाटा वरवंट्यावर भरडून घ्या. मिक्सरवर गरगरीत भरडून घेऊ शकता.
>> तयार भरितामध्ये मिरची, कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, मीठ घाला आणि आवडत असल्यास एक चमचा कच्चे तेल घाला.
>> परवलाचे चटपटीत भरीत तयार!
>> यानंतर नाचणीची उकड चार ते पाच मिनिटं मळून घ्या.
>> छोट्या छोट्या भाकऱ्या लाटून किंवा थापून घ्या. अधिक सजावटीसाठी आणि पौष्टिकतेसाठी त्यावर वेगवेगळ्या बिया चिकटवा.
>> भाकरी तव्यावर छान फुलते, कापडाच्या दबावाने ती शेकून घ्या आणि आवडत असल्यास तूप घालून भरीत भाकरी सर्व्ह करा.