बारा महिने मिळणारी स्वस्त आणि मस्त भाजी म्हणजे ढोबळी मिरची. कांदा, बटाटा, टोमॅटोसारखी ती सुद्धा इतर भाज्यांबरोबर सगळ्यांशी जुळवून घेते. तर काही पदार्थात ती लज्जतही वाढवते. मात्र फक्त ढोबळी मिरचीची भाजी करायची म्हटली तर पीठ पेरून केलेली भाजी अनेकदा कोरडी पडते. विशेषतः टिफिनमध्ये नेण्यासाठी ती नकोशी वाटते. मात्र पुढे दिलेल्या पद्धतीने केली तर ती कोरडी होणार नाही आणि टिफिनमध्ये नेता येईल, शिवाय तोंडी लावण्यासाठी अर्थात पुरक पदार्थ म्हणूनही करता येईल.
साहित्य :
पाव शेर ढोबळी मिरची
एक मध्यम आकाराचा बटाटा
एक मध्यम आकाराचा कांदा
हरभरा डाळीचे पीठ २ चमचे
थालीपीठाची भाजणी २ चमचे
एक छोटा चमचा लाल तिखट
स्वादानुसार मीठ ,
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती :
>> ढोबळी मिरचीच्या बिया काढून चौकोनी तुकडे करून घ्या.
>> मध्यम आकाराचा कांदा चौकोनी चिरून घ्या आणि बटाट्याचे बारीक काप करून घ्या.
>> सगळ्या भाज्या एकसारख्या चिरल्या तर त्या लवकर शिजतात.
>> कढईत फोडणीसाठी तेल घ्या. त्यात मोहरी, हिंग, हळद आणि बटाट्याचे काप घाला आणि एक वाफ काढून घ्या.
>> बटाटा शिजला की त्यात कांदा परतून घ्या आणि कांदा छान परतला की त्यात ढोबळी मिरची घाला.
>> कांदा बटाटा घातल्याने ढोबळी मिरचीने होणार ऍसिडिटी होत नाही.
>> एक वाफ काढून झाल्यावर मिरची शिजली की त्यात तिखट पावडर, मीठ घाला.
>> भाजीला खमंगपणा येण्यासाठी बेसन आणि थालीपीठाची भाजणी घाला आणि पुन्हा वाफ काढून घ्या.
>> बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
पहा भाग्यश्री करंदीकर यांचा रेसेपी व्हिडीओ :