भारतात जर सर्वात जास्त लोकप्रिय पेय काय असेल तर ते चहा आहे. आपल्या देशातील बहुतेक लोकांचा दिवस गरम चहाच्या कपने सुरू होतो. आजकाल तरुण पिढीमध्ये कॉफीची क्रेझही वाढत आहे. विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये हे खूप लोकप्रिय होत आहे. मोठ्यांसाठी कॉफी किंवा चहा पिणे पूर्णपणे सामान्य आहे परंतु अनेकदा काही पालक लहान मुलांना चहा किंवा कॉफी प्यायला देतात जे अजिबात योग्य नाही. डॉक्टरही अनेकदा मुलांना चहा किंवा कॉफी देऊ नका असा सल्ला देतात. मुलांना कोणत्या वयात चहा किंवा कॉफी देणं सुरक्षित आहे याबद्दल पालक अनेकदा गोंधळून जातात. त्याबाबत याबद्दल जाणून घेऊया....
आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या मुलाला चहा किंवा कॉफी देत असाल तर त्याचं वय किमान १४ वर्षे असलं पाहिजे. या वयाच मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो. अशा परिस्थितीत, चहा किंवा कॉफीमध्ये असलेल्या टॅनिन आणि कॅफिनमुळे मुलांच्या शरीरात कॅल्शियम आणि इतर पोषक तत्वांची कमतरता असू शकते.
मुलांच्या वाढीवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. यानंतरही मुलांना १८ वर्षे वयापर्यंत कमी प्रमाणात कॉफी किंवा चहा द्यावा. काही पालक अगदी लहान वयातच मुलांना चहा किंवा कॉफी देतात. विशेषतः जेव्हा मुलाला सर्दी आणि खोकला असतो तेव्हा पालकांना वाटतं की, गरम चहा प्यायल्याने मुलाला आराम मिळेल. पण ते फायदेशीर ठरण्याऐवजी त्यामुळे नुकसान होऊ शकतं.
चहामध्ये 'टॅनिन' असतं, जे मुलांचे दात आणि हाडं कमकुवत करतं. याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. जर आपण कॉफीबद्दल बोललो तर त्यातही कॅफिन असतं, जे पोटाशी संबंधित समस्यांना उत्तेजन देऊ शकते. जास्त कॅफिनचे सेवन केल्याने मुलांच्या झोपेच्या चक्रावरही परिणाम होतो, ज्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो.