घराघरात सण-समारंभ असो वा पाहुण्यांचा पाहुणचार, 'पनीर'ची एखादी डिश म्हणजे जेवणाची शान असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोठ्या आवडीने पनीरच्या भाजीवर ताव मारतात. मात्र, अनेकदा मोठी मेहनत घेऊन तयार केलेली ही स्पेशल डिश ऐन वेळी निराशा करते. कधी ग्रेव्हीमध्ये सोडल्यावर पनीरचे तुकडे तुटतात, तर कधी ते खाताना रबरासारखे चिवट लागतात. यामुळे केवळ जेवणाची चवच बिघडत नाही, तर गृहिणींचा आणि खवय्यांचाही मोठा विरस होतो. हॉटेलमधील पनीरसारखा तो 'मेल्ट-इन-माउथ' अनुभव घरात का येत नाही, हा प्रश्न अनेकांना सतावतो. यावर उत्तर म्हणून साध्या पण प्रभावी टिप्स कामी येतील.
१. पनीरमधील ओलावा (Moisture) कमी करा
पनीर चिकटण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील पाणी. फ्रीजमधून पनीर काढल्याबरोबर लगेच फ्राय करू नका.
टीप: पनीरचे तुकडे करण्यापूर्वी ते किचन टॉवेल किंवा सुती कपड्याने नीट पुसून घ्या. पनीर जेवढे कोरडे असेल, तेवढे ते कमी चिकटेल.
२. तव्याचे तापमान योग्य ठेवा
जर तवा नीट तापलेला नसेल, तर पनीर त्यावर चिकटते.
टीप: पनीर टाकण्यापूर्वी तवा चांगला गरम होऊ द्या. तेल किंवा तूप तव्यातून धूर निघेपर्यंत गरम झाले की मगच पनीरचे तुकडे टाका.
३. नॉन-स्टिक पॅनचा वापर
जर तुम्ही नवखे असाल, तर साध्या लोखंडी तव्याऐवजी नॉन-स्टिक पॅन वापरणे सोपे पडते. यात कमी तेलातही पनीर नीट फ्राय होते.
४. कोटिंगची जादू (The Flour Trick)
पनीरला एक हलके कोटिंग दिल्यास ते कुरकुरीत होते आणि चिकटत नाही.
टीप: पनीरच्या तुकड्यांवर थोडे कॉर्नफ्लोर (Cornflour) किंवा मैदा भुरभुरा. यामुळे पनीरला एक थर मिळतो आणि ते पॅनला चिकटण्यापासून वाचते.
५. मीठ आणि तेलाचा वापर
तव्यावर तेल गरम करताना त्यात चिमूटभर मीठ टाका. यामुळे तव्यावर एक 'नॉन-स्टिक' लेयर तयार होतो, ज्यामुळे पनीर सहज पलटता येते.
६. घाई करू नका
पनीर तव्यात टाकल्याबरोबर लगेच ते उलथण्याने (flip) उलटू नका.
टीप: एक बाजू पूर्णपणे लालसर किंवा सोनेरी होऊ द्या. पनीर खालून नीट शिजले की ते स्वतःहून तवा सोडते.
पनीर मऊ ठेवण्यासाठी 'बोनस टीप':
पनीर फ्राय केल्यावर ते कधीकधी रबरासारखे कडक होते. हे टाळण्यासाठी, फ्राय केलेले पनीर लगेच हल्क्या कोमट पाण्यात २-३ मिनिटे टाकून ठेवा. यामुळे पनीर हॉटेलसारखे मऊ (Soft) राहते.
