Join us

Kitchen Tips : पावसाळ्यात मसाल्याच्या डब्यातले पदार्थ लगेच खराब होतात? टिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 18:28 IST

Kitchen Tips कधी झाकणं व्यवस्थित लावलं जात नाही तर कधी हात ओले असतात. त्यामुळे डब्याचे पदार्थ खराब होतात. कधी मसाल्यांना बुरशी लागते तर कधी गुठळ्या होतात:

स्वयंपाक म्हटलं की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे मसाल्याचा डबा. घरोघरच्या बायकांना मसाल्याचा डबा दर चार ते पाच दिवसांनी भरून ठेवावा लागतो. पण पावसाळ्यात अनेकदा वापरासाठी काढून ठेवलेला लाल मसाला, चटणी, हळद किंवा खडा मसाला खराब होण्याची शक्यता असते. कारण सकाळ, संध्याकाळ आपण त्याच डब्याला हात लावतो. 

कधी झाकणं व्यवस्थित लावलं जात नाही तर कधी हात ओले असतात. त्यामुळे डब्याचे पदार्थ खराब होतात. कधी मसाल्यांना बुरशी लागते तर कधी गुठळ्या होतात.  गुठळ्या झालेला मसाला किंवा हळद जेवणात वापरली तर नेमकी किती टाकावी याचा अंदाज येत नाही. काही टिप्स वापरून तुम्ही मसाल्याचा डबा पावसाळ्यात चांगला ठेवू शकता.  

फ्रिजमध्ये मसाले ठेवू नका

खूप लोक खराब होऊ नये म्हणून मसाल्याची पाकिटं, खडा मसाला फ्रिजमध्ये ठेवतात पण ते चुकीचं आहे. मसाले फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याचा सुगंध, चव निघून जाते. त्यामुळे मसाले फ्रिजमध्ये ठेवताना शक्यतो एअर-लॉक कंटेनरमध्ये भरून मगच फ्रिजमध्ये ठेवा.  अन्यथा बाहेर रूम टेंमरेचरवर मसाले ठेवलेलं कधीही उत्तम ठरतं. 

मसाले कोरड्या ठिकाणी ठेवा

भरपूर प्रमाणात मसाले खरेदी करून ठेवू नका. त्याऐवजी गरज लागेल तेव्हा मसाले विकत आणा आणि बरणीत ठेवा. ज्यामुळे त्यांचा सुंगध नेहमी ताजा राहील. जर तुम्ही वर्षभराचा मसाला बनवून ठेवला असेल तर एक चांगली बरणी धुवून पुसून  त्यात मसाला भरा त्यावर कागद ठेवा मग झाकण लावा. नंतर एका चांगल्या सुती कापडात ही बरणी बांधून ठेवा. तुम्हाला हवा तसा त्यातून तुम्ही काढू शकता.

हिंगाचा वापरा

मसाला डब्यात भरल्यावर त्याच्यात एक हिंगाचा मोठा तुकडा टाकावा. हिंगामुळे मसाला खराब होत नाही आणि मसाल्याचा वासही कायम राहतो.  याशिवाय मसाल्याच्या डब्यात कोणता चमचा ठेवताय हे पाहा. अनेकदा ओलसर चमचा आत ठेवल्यानं बुरशी लागते. मसाल्याचा डबा शक्यतो पाण्याच्या भांड्याबरोबर ठेवू नका. जेणेकरून  चांगला राहिल.

उपाय

मसाले खराब होवू नये म्हणून ते हलके गरम करुन घेतले तरी चालतात. यासाठी मसाले थेट गॅसवर भांड ठेवून गरम करु नये. त्यामुळे मसाले जळतात आणि त्यांची चवही जाते. आधी कढई किंवा तवा गॅसवर मंद आचेवर गरम करावा. कढई गरम झाली की मग ती गॅसवरुन खाली उतरवावी. आणि त्यात मसाले टाकून ते हलके गरम होईपर्यंत हलवून घ्यावे. या उपायानेही मसाल्यातला ओलसरपणा निघून जातो आणि मसाल्यांचा स्वाद आणि रंग तसाच रहातो.

पावसाळ्यात पावडर स्वरुपातले मसाले खराब होतात. यावर उपाय ¸म्हणून पावसाळ्याच्या काळात जास्तीत जास्त खडे मसाले वापरावेत. घरात खडे मसाले आणून ठेवावेत. आणि गरजेनुसार त्याची पावडर करुन ते वापरावेत. गरजे इतकेच वाटल्यामुळे ते खराब होण्याचा प्रश्नच येत नाही. 

टॅग्स :हेल्थ टिप्सअन्न