बाहेर पाऊस आणि घरात सगळे सदस्य असले, की गृहिणींचे काम वाढते. चहा, भजी, पावभाजी, वडापाव अशा फर्माईश सुरु होतात. गृहिणी ते आनंदाने करतातही. पण त्यानंतर होणारा पसारा आणि त्याबरोबरीने दैनंदिन कामात अन्न-धान्याची निगा राखण्याचे काम वाढते, त्याचा कंटाळा येतो. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात. म्हणून त्याची वेळोवेळी काळजी घ्यावी लागते. अशातच साठवणुकीत असणारे आणि स्वयंपाकात पटकन कामी येणारे कांदे बटाटे कुजून चालत नाही वा त्याला कोंब येऊनही उपयोग नाही. अशा वेळी काय उपाय करता येईल ते जाणून घेऊ.
पावसाळ्यात कांदे, बटाटे सडण्याचे प्रमाण जास्त असते. ते फेकून देणे जीवावर येते. या काळात कोरडा कांदा, कोरडा बटाटा मिळणे अवघड असते. सगळ्याच घरांमध्ये पावसाळ्यापूर्वी पोतंभर कांदे आणून वाळवून ठेवले जात नाहीत. गरजेनुसार लागतील तेवढे कांदे बटाटे आणून आठवडाभर साठवणूक करणारीही अनेक मंडळी आहेत. त्यांना पुढील उपाय नक्की कामी येतील.
बटाटे आणि कांदे कोरडे ठेवण्यासाठी टिप्स :
बटर पेपर : आपण स्वयंपाकघरात अनेक पदार्थ बनवण्यासाठी बटर पेपर वापरतो. तोच आता कांदे बटाट्याच्या टोपलीतही वापरायचा आहे. बटर पेपरमुळे वातावरणातील आर्द्रता शोषून घेतली जाते, त्यामुळे कांदे, बटाटे कोरडे राहतात. ते कुजत नाहीत वा त्याला कोंब येत नाहीत.
तुरटी : पावसाळ्यात तुरटीचा वापर पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी तर होतोच, शिवाय कांदे बटाटे सुरक्षित ठेवण्यासाठीही करता येतो. कांदे बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून तुरटीचे तुकडे घ्या आणि त्यांना सुती कापडात बांधून एक पुडी बनवा. ती पुडी कांदे-बटाट्याच्या टोपलीत ठेवा. त्यामुळेही कांदे बटाटे कोरडे राहतील आणि त्यांना कोंब येणार नाहीत.
वाळू, लसूण आणि बेकिंग सोडा : यासाठी एक टोपली घ्या. त्यात बटर पेपर टाका आणि त्यावर सोडा मिश्रित वाळू पसरून घ्या. त्यात पाच सहा लसणाच्या कळ्या टाका आणि मग त्यावर कांदे बटाटे ठेवा. त्यामुळे कांदे बटाट्यांना मोड येण्याची प्रक्रिया थांबेल आणि ते कोरडे राहतील.
बोनस टीप : कोंदट जागेमधे कांदे बटाटे ठेवू नका, हवेशीर जागेत ठेवा. तसेच एरव्ही आपण कांदे बटाटे एकत्र ठेवतो, मात्र पावसाळ्यात दोन्ही गोष्टींच्या दोन टोपल्या वेगवेगळ्या ठेवा. त्यामुळेही हे दोन्ही घटक दीर्घकाळ चांगले राहतील आणि स्वयंपाकात अडी अडचणीला पटकन कामी येतील.