खान्देशचा अस्सल स्वाद आणि पारंपरिक पदार्थ म्हणजेच खान्देशी उडीद वडे... खान्देशात लग्नसमारंभ असो किंवा खास प्रसंग, सण असो गरमागरम, चटपटीत 'उडीद वड्यांशिवाय' ताट पूर्णच होत नाही. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद असलेले हे वडे जेव्हा गरम रस्सा किंवा कढीसोबत वाढले जातात, तेव्हा त्यांची चव कित्येक पटीने वाढते. चवदार असलेले खमंग असे हे खान्देशी उडीद वडे खान्देशी जेवणाची खरी ओळख मानले जातात. साध्या उडीद डाळीपासून तयार होणारी ही रेसिपी मसाल्यांच्या योग्य प्रमाणामुळे आणि पारंपरिक पद्धतीमुळे खास बनते. हे वडे बनवणे ही एक कला आहे. डाळ भिजवण्यापासून ते पीठ वाटण्यापर्यंत आणि ते वडे हातावर थापून गरम तेलात सोडण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात खान्देशी गृहिणींचे कसब दडलेले असते(Khandeshi urad dal vade recipe).
साध्या उडीद डाळीपासून तयार होणारे हे वडे (urad dal vada Maharashtrian style) त्यांच्या खास मसालेदार चवीमुळे आणि कुरकुरीतपणामुळे आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहेत. पूर्वी आजी-आई हातावरचं मोजमाप वापरून वडे तयार करायच्या आणि त्यांचा सुवास संपूर्ण घरभर दरवळायचा. आजही त्या पारंपरिक पद्धतीने बनवलेले उडीद वडे सणावाराला, पाहुण्यांसमोर किंवा खास जेवणात आवर्जून केले जातात. खान्देशच्या मातीतील खाद्यसंस्कृतीची एक वेगळीच ओळख आहे. झणझणीत 'शेवभाजी' किंवा 'वांग्याचं भरीत' जितकं लोकप्रिय आहे, तितकंच महत्त्व येथील 'उडीद वड्यांना' आहे. हे केवळ वडे नसून खान्देशच्या आदरातिथ्याची आणि सणासुदीची शान आहेत. डाळ वाटण्यापासून वडे थापण्यापर्यंतच्या पारंपारिक पद्धतीमुळेच याला ती अस्सल गावरान चव येते. खान्देशच्या (authentic Khandeshi vade) मातीतील ही पारंपारिक रेसिपी आणि ते परफेक्ट बनवण्यासाठीच्या काही खास टिप्स पाहूयात...
साहित्य :-
१. पांढरी उडीद डाळ - १ कप
२. पाणी - गरजेनुसार
३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४
४. आलं - १ ते २ छोटे तुकडे
५. लसूण पाकळ्या - ५ ते ८
६. जिरे - १ टेबलस्पून
७. धणे - १ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
९. हिंग - चिमूटभर
१०. कडीपत्ता - १ टेबलस्पून (बारीक चिरलेला)
११. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून
१२. तेल - तळण्यासाठी
बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ! घरीच करा उडपी स्टाईल खमंग डाळ वडे - गुलाबी थंडीतील झक्कास बेत...
कृती :-
१. पांढरी उडीद डाळ पुरेशा पाण्यांत ६ ते ८ तास भिजवून घ्यावी.
२. त्यानंतर या डाळीतील संपूर्ण पाणी काढून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा घालून सगळे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून पाण्याचा वापर न करताच घट्टसर असे वाटून घ्यावे.
३. जिरे, धणे हलकेच जाडसर भरड होईपर्यंत एकत्रित ठेचून घ्यावे. हीच धणे - जिरेपूड तयार वड्यांच्या बॅटरमध्ये घालावी.
४. याच तयार बॅटरमध्ये चवीनुसार मीठ, हिंग, बारीक चिरलेला कडीपत्ता, बेकिंग सोडा घालून बॅटर कालवून एकजीव करून घ्यावे.
५. आता एक वाटी घेऊन त्यावर हलकेच ओले केलेलं सुती कापड गुंडाळून घ्यावे. मग त्यावर थोडे - थोडे बॅटर घालून वडे हाताने हलकेच दाब देत थापून घ्यावेत.
६. कढईत तेल व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम तेलात वाटीवर थापून घेतलेला वडा सोडून तो हलका गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावा.
खांदेशी गरमागरम उडीद वडे खाण्यासाठी तयार आहेत. हे वडे हिरवी चटणी किंवा दह्यासोबत खाण्यासाठी अधिकच चविष्ट लागतात.
