lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > कुणाल खेमूच्या घरी महाशिवरात्रीच्या प्रसादात काश्मिरी राजमा , कसा करायचा काश्मिरी पध्दतीचा सात्त्विक राजमा?

कुणाल खेमूच्या घरी महाशिवरात्रीच्या प्रसादात काश्मिरी राजमा , कसा करायचा काश्मिरी पध्दतीचा सात्त्विक राजमा?

कुणाल खेमूच्या महाशिवरात्रीच्या पोस्टमध्ये चिमुकल्या इनायासोबतच सात्त्विक काश्मिरी राजमानं वेधलं लक्ष.. सात्त्विक काश्मिरी राजम्याची पध्दत आणि चव एकदम भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2022 06:18 PM2022-03-01T18:18:14+5:302022-03-01T18:31:05+5:30

कुणाल खेमूच्या महाशिवरात्रीच्या पोस्टमध्ये चिमुकल्या इनायासोबतच सात्त्विक काश्मिरी राजमानं वेधलं लक्ष.. सात्त्विक काश्मिरी राजम्याची पध्दत आणि चव एकदम भारी!

Kashmiri rajma in Mahashivaratri prasad in kunal khemu's mahashivratri puja at his house in Kashmir... how to make sattvic Kashmiri Rajma ? | कुणाल खेमूच्या घरी महाशिवरात्रीच्या प्रसादात काश्मिरी राजमा , कसा करायचा काश्मिरी पध्दतीचा सात्त्विक राजमा?

कुणाल खेमूच्या घरी महाशिवरात्रीच्या प्रसादात काश्मिरी राजमा , कसा करायचा काश्मिरी पध्दतीचा सात्त्विक राजमा?

Highlightsकाश्मिरी सात्त्विक राजम्याचं विशेष म्हणजे त्याचा मसाला.सात्त्विक पध्दतीने काश्मिरी राजमा करताना त्यात कांदा आणि लसणाचा वापर टाळला जातो.दही घातल्याने काश्मिरी राजमाची चव वाढते. 

महाशिवरात्रीच्या प्रसादाच्या ताटात साबुदाणा, राजगिरा, कवठ, फळं हे आपण नेहमीच बघतो. पण अभिनेता कुणाल खेमू आणि पत्नी अभिनेत्री सोहा अली खानने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोत काश्मिरी राजमानं सर्वांचं लक्ष वेधलं. हे असं कसं हा प्रश्न हा फोटो पाहाताक्षणी पडला. याच्ं कारण म्हणजे  देशभरात महाशिवरात्रीनिमित्त शंकराची पूजा वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते. कुणाल खेमू हा काश्मिरी पंडित आहे. काश्मिरी पंडितांमध्ये महाशिवरात्रीच्या पुजेला विशेष महत्त्व. महाशिवरात्रीला काश्मिरमध्ये हर रात्री असं म्हटलं जातं.

Image: Google

कुणाल खेमुने आपल्या कुटुंबासमवेत काश्मिरमधील गावातल्या घरी जाऊन पारपरिक पध्दतीने महाशिवरात्रीची जलाभिषेक, दुग्धाभिषेक करुन पूजा केली. पुजेचे फोटो, व्हिडीओ कुणाल आणि सोहाने आपआपल्या इन्स्टाग्राम अकाउण्टवरुन शेअर केले. या फोटो आणि व्हिडीओत पुजेच्या दरम्यान, प्रसादाचं ताट वाढताना इनायानं केलेली गोड लुड्बुड सगळ्यांचं लक्ष वेधून गेली. या सर्वात आणखी एका गोष्टीनं लक्ष वेधलं ते म्हणजे प्रसादाच्या ताटातल्या काश्मिरी राजमानं.

देशात इतरत्र मिळणाऱ्या राजम्यपेक्षा काश्मिरमधला राजमा वेगळा असतो. तो लहान आणि रंगानं अधिक गडद असतो. पंजाबी राजमा आणि काश्मिरी राजमा यात फरक आहे. इतकंच नाही तर काश्मिरमध्येही राजमा करण्याच्या विविध पध्दती आहेत. कुणाल खेमू याने पोस्ट केलेल्या फोटोतील राजमा हा काश्मिरचा सात्विक राजमा म्हणून ओळखला जातो. 

Image: Google

काश्मिरी सात्त्विक राजम्याचं विशेष म्हणजे त्याचा मसाला. सात्त्विक पध्दतीने काश्मिरी राजमा करताना त्यात कांदा आणि लसणाचा वापर टाळला जातो. तमालपत्रं, हिंग, टमाटा, मिरची, आलं, लाल तिखट, गरम् मसाला आणि दही  हे घटक वापरुन सात्त्विक पध्दतीचा काश्मिरी राजमा तयार केला जातो. कुणाल खेमूने पोस्ट केलेल्या फोटोतील राजमा पाहून कोणालाही हा राजमा करुन बघावासा वाटेल. 

Image: Google

कसा करायचा सात्त्विक काश्मिरी राजमा?

सात्त्विक काश्मिरी राजमा करण्यासाठी  1 कप राजमा ( रात्रभर भिजवलेला/ 12-14 तास भिजवलेला) , 2 तमाल पत्रं, 2 चमचे मोहरी तेल, चिमूटभर हिंग, 1 चमचा जिरे, 3 मोठ्या टमाट्यांची प्युरी,  1 मोठा चमचा किसलेलं आलं,  2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 मोठा चमचा वाटलेले धने, अर्धा चमचा लाल तिखट, पाऊण चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि पाऊण वाटी दही घ्यावं. 

Image: Google

काश्मिरी पध्दतीचा राजमा करण्यासाठी भिजवलेला राजमा कुकरमध्ये घालावा. त्यात 6 कप पाणी आणि 2 तमालपत्रं घालून तो शिजवावा. तो बाहेर भांड्यात शिजवला तरी चालतो. राजमा बाहेर शिजायला जरा वेळ घेतो. पण कुकरच्याबाहेर राजमा शिजवल्याने भाजीची चव मस्त लागते. राजमा चांगला मऊ शिजेपर्यत शिजवावा. राजमा शिजला की पाणी आणि राजमा वेगवेगळं काढून ठेवावं. एका कढईत मोहरीचं तेल तापवावं. ते गरम झालं की त्यात आधी हिंग घालावा. लगेचंच त्यात जिरे घालावेत. आलं घालावं. टमाटा,ओबड धोबड वाटलेले धणे आणि मिरच्यांचे तुकडे घालावेत. सर्व नीट एकजीव होईपर्यंत परतावं.

टमाटा शिजून तो फोडणीत चांगला मिसळला गेला की त्यात शिजवलेल्या राजम्यातला निम्मा राजमा घालावा. हा राजमा मॅशरनं किंवा चमच्याच्या पसरट बाजूने दाबून कुस्करावा. राजमा आणि टमाटा कुस्करला की हे मिश्रण 10 मिनिटं शिजू द्यावं. नंतर एका भांड्यात दही घ्यावं. ते फेटून मिश्रणात घालावं. त्यात ते मिसळून घेतलं की मग शिल्लक राहिलेला राजमा घालावा. भाजी किती पातळ आणि घट्ट हवी हे बघून त्या बेतानं राजमा शिजवलेलं पाणी गरम करुन थोडं थोडं घालावं. नंतर यात मीठ, गरम मसाला, लाल तिखट घालून ते नीट हलवून घ्यावं.

भाजीला पुन्हा उकळी काढावी. गॅस बंद करण्याआधी त्यात चिरलेली कोथिंबीर घालावी. बासमती तांदळाच्या भातासोबत असा सात्विक पध्दतीचा काश्मिरी राजमा खाण्याची पध्दत आहे. 


 

Web Title: Kashmiri rajma in Mahashivaratri prasad in kunal khemu's mahashivratri puja at his house in Kashmir... how to make sattvic Kashmiri Rajma ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.