Join us

कडू कारलं आवडत नाही? शेफ कुणाल कपूर सांगतात करा कारल्याचे कुरकुरीत चिप्स, ५ मिनीटांत होणारी सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2022 13:59 IST

Karla Bitter gourd Crispy Chips Recipe by Chef Kunal Kapoor : चिप्स म्हटले की लहान मुलं तर खूश होतातच पण मोठ्यांनाही जाता येता खायला हे चिप्स अतिशय चविष्ट लागतात.

ठळक मुद्देतव्यावर तेल घालून घोळवलेले चिप्स तेलात फ्राय करुन घ्यायचे. मग हे कुरकुरीत चिप्स खाण्यासाठी तयार.कारल्याचे कुरकुरीत चिप्स केले तर ते खायलाही छान लागतात आणि नकळत कारलं पोटात जातं ते वेगळंच.

कारल्याची भाजी म्हटली की घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. कारलं चवीला कडू असलं तरी आरोग्यासाठी ते अतिशय फायदेशीर असतं. त्यामुळे कारलं खायला हवं असं आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर आवर्जून सांगतात. मात्र कारल्याचा कडूपणा घालवायचा कसा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकींना स्वयंपाक करताना पडतो. मग कधी ते खूप काळ पाण्यात भिजवून, फडक्यात बांधून किंवा अगदी त्याला चिंच-गूळ घालून भाजी केली तरी ती थोडी का होईना कडी होतेच. अशावेळी या कारल्याचे कुरकुरीत चिप्स केले तर ते खायलाही छान लागतात आणि नकळत कारलं पोटात जातं ते वेगळंच. चिप्स म्हटले की लहान मुलं तर खूश होतातच पण मोठ्यांनाही जाता येता खायला हे चिप्स अतिशय चविष्ट लागतात. आता हे चिप्स करायचे कसे? तर प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर झटपट आणि खमंग चिप्स कसे करायचे याची रेसिपी सांगतात. कुणाल कपूर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कायमच काही ना काही शेअर करत असतात, त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही बरीच आहे. पाहूया हे कारल्याचे कुरकुरीत चिप्स कसे करायचे (Karla Bitter gourd Crispy Chips Recipe by Chef Kunal Kapoor)...

(Image : Google)

साहित्य - 

1. कारली - २ 

2. मीठ - पाव चमचा 

3. लिंबाचा रस - २ चमचे

4. काळं मीठ - पाव चमचा 

5. हळद - अर्धा चमचा

6. तिखट - अर्धा चमचा 

7. कॉर्न स्टार्च - १ चमचा

8. बेसन पीठ - २ चमचे 

9. आमचूर पावडर - अर्धा चमचा 

कृती - 

१. कारली स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून पातळ काप करुन घ्यायचे. 

२. त्यावर मीठ आणि लिंबाचा रस घालून ते ३० मिनीटांसाठी तसेच ठेवायचे. 

३. त्यानंतर ही कारली एका बाऊलमध्ये पाण्यात चांगली भिजवायची. 

४. मग काढून एका फडक्यावर टाकून कोरडी करुन घ्यायची. 

५. एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यावर काळं मीठ, आमचूर पावडर, हळद, तिखट, कॉर्न स्टार्च, बेसन पीट घालून सगळे चांगले घोळवून घ्यायचे. 

६. तव्यावर तेल घालून घोळवलेले चिप्स तेलात फ्राय करुन घ्यायचे. मग हे कुरकुरीत चिप्स खाण्यासाठी तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.