Join us

काजूच्या बोंडूचं भरीत- ऐश्वर्या नारकरांनी सांगितली कोकणातली पारंपरिक रेसिपी, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2025 14:24 IST

Actress Aishwarya Narkar Shared Kajuchya Bondacha Bharit Recipe: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केलेली काजूच्या बोंडूच्या भरीताची रेसिपी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे..

ठळक मुद्देही मस्त पारंपरिक, पौष्टिक रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा.. 

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. त्यांनी शेअर केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींना चाहत्यांकडूनही नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. आता नुकतीच त्यांनी काजूच्या बोंडूचं भरीत ही एक पारंपरिक रेसिपी शेअर केली आहे. ही अस्सल कोकणी रेसिपी पाहायला जेवढी छान वाटते तेवढीच ती चवदारही होते. हा पदार्थ करायला अतिशय सोपा आहे. काही ठिकाणी तो काजूच्या बोंडूची भाजी म्हणूनही ओळखला जातो. भाजी म्हणा किंवा भरीत म्हणा हा चवदार पदार्थ जर तुम्हाला ट्राय करून पाहायचा असेल तर ऐश्वर्या नारकरांचा व्हायरल व्हिडिओ बघाच...(Actress Aishwarya Narkar Shared Kajuchya Bondacha Bharit Recipe)

काजुच्या बोंडूचं भरीत रेसिपी

 

साहित्य

६ ते ७ काजुची बोंडं

४ ते ५ हिरव्या मिरच्या

२ ते ३ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

२ टेबलस्पून दही

चवीनुसार मीठ

फोडणीसाठी २ टीस्पून तूप, जिरे, हिंग

 

कृती

सगळ्यात आधी काजूचे बोंडू स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याची वरची आणि खालची दोन्ही देठं काढून घ्या.

यानंतर ती अगदी बारीक चिरून घ्या आणि एका कुकरच्या डब्यामध्ये घालून वाफवून घ्या.

वाफवून झाल्यानंतर ते एका भांड्यात काढून हातानेच चुरून घ्या किंवा मग रवीने फेटून घ्या.

त्यानंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर खलबत्त्यात घालून कुटून घ्या आणि चुरलेल्या बोंडूमध्ये घाला. त्यातच थोडे दही आणि मीठ घालून सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. काही ठिकाणी या भरीतामध्ये थोडा दाण्याचा कूट घातला जातो. तुम्हाला आवडत असेल तर घालून पाहा.

यानंतर एक छोटीशी कढई गॅसवर गरम करायला ठेवा. त्यामध्ये तूप, जिरे, मोहरी, हिंग घालून फोडणी करा आणि ती फोडणी तयार केलेल्या भरीतामध्ये घाला. या फोडणीमध्ये थोडा कढीपत्ताही घालू शकता. ही मस्त पारंपरिक, पौष्टिक रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा.. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.ऐश्वर्या नारकर