उन्हाळा म्हटलं की डोळ्यांसमोर सगळ्यांत आधी येतात त्या रसाळ, आंबट - गोड चटपटीत कैऱ्या... कैरीचं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. रोजच्या नाश्त्याला तेच तेच पोहे किंवा उपीट खाऊन कंटाळा आला असेल, तर कैरीचा किस करुन तयार केलेलं थालीपीठ तुमच्या सकाळची सुरुवात नक्कीच खास करेल. कैरीचा आंबटपणा, मसाल्यांचा खमंगपणा आणि वरून साजूक तुपाची धार...ही चव एकदा चाखली की तुम्ही पुन्हा पुन्हा हेच थालीपीठ नाश्त्यासाठी कराल(Kairicha Thalipeeth Recipe).
कडाक्याच्या उन्हात शरीराला थंडावा देणारे आणि तोंडाची चव वाढवणारे पदार्थ आपण शोधत असतो. कैरी केवळ चवीलाच छान नसते, तर ती आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे किंवा चटणी करण्यासोबतच, कैरीचे खमंग थालीपीठ हा एक उत्तम नाश्त्याचा पदार्थ होऊ शकतो. मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक पौष्टिक आणि झटपट होणारा पर्याय आहे. घरातील सहज उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होणाऱ्या या पदार्थामध्ये कैरीची खास चव प्रत्येक घासात जाणवते. साध्या थालीपीठाला जेव्हा कैरीचा ट्विस्ट मिळतो, तेव्हा त्याची चव कित्येक पटीने वाढते. उन्हाळा (How To Make Kairicha Thalipeeth At Home) संपण्यापूर्वी कैरीच्या या आगळ्यावेगळ्या पदार्थाचा आनंद नक्कीच घ्यायला हवा.
साहित्य :-
१. कैरीचा किस - २ कप
२. गव्हाचं पीठ - १ कप
३. बेसन - १ कप
४. मीठ - चवीनुसार
५. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
६. हळद - १ टेबलस्पून
७. धणेपूड - १ टेबलस्पून
८. जिरे - १ टेबलस्पून
९. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
१०. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून
११. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
१२. तेल - १/२ कप
१३. पाणी - गरजेनुसार
रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...
झणझणीत गावरान चवीचा खा कैरीचा ठेचा, लोणच्यापेक्षा भारी चव-उन्हाळ्यातल्या जेवणाची वाढेल रंगत...
कृती :-
१. कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून किसणीवर किसून त्याचा किस तयार करावा.
२. एका मोठ्या बाऊलमध्ये कैरीचा किस घेऊन त्यात गव्हाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, हळद, धणेपूड, जिरे, आलं - लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडं तेल व गरजेनुसार पाणी घालून बॅटर थोडं मध्यम पातळसर कंन्सिस्टंसीच करावं.
३. त्यानंतर तव्यावर थोडं तेल पसरवून थालीपीठाच बॅटर तव्यावर घालून ते हाताने किंवा चमच्याने व्यवस्थित गोलाकार पसरवून घ्यावं.
४. तेल चारही बाजूने सोडून थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे.
कैरीचे आंबट - चिंबट चवीचे खमंग, खरपूस असे गरमागरम थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. दही, लोणचं, सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत हे थालीपीठ खायला अतिशय चविष्ट लागतं.
