Join us

कैरीच्या सिझनमध्ये तोंडी लावायला करा कांदा-कैरीची चटपटीत चटणी, जेवण होईल झक्कास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 17:27 IST

Kairi Kanda Chutney Recipe Raw Mango : जेवणाला लज्जत आणणारी आणि चटपटीत अशी ही चटणी कशी करायची पाहूया...

उन्हाळा म्हटलं की बाजारात कैऱ्या, आंबे यायला लागतात. मग फळांच्या या राजाचे कोणते पदार्थ करु आणि कोणते नको असे आपल्याला होऊन जाते. मग घरोघरी कैरीचं पन्ह, कैरीची डाळ यांबरोबरच कैरीचं लोणचं आणि चटण्या केल्या जातात. कैरीचं तक्कू, मेथांबा, साखरांबा हे पदार्थ तर आपण करतोच. पण अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने केली जाणारी कैरी आणि कांद्याची चटणीही तितकीच चविष्ट होते. आंबट गोड आणि तरीही थोडीशी झणकेदार अशी ही चटणी चवीला तर चांगली लागतेच पण उत्तम आरोग्यासाठीही ही चटणी अतिशय फायदेशीर असते. कैरीमुळे उन्हाळ्यात जेवण जायला मदत होते आणि कांदा उष्णता कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. जेवणाला लज्जत आणणारी आणि चटपटीत अशी ही चटणी कशी करायची पाहूया (Kairi Kanda Chutney Recipe Raw Mango)... 

साहित्य - 

१. कैरी - १  

२. कांदा - १ 

३. शेंगदाण्याचं कूट - २ चमचे 

(Image : Google)

४. गूळ - २ चमचे  

५. सैंधव मीठ - अर्धा चमचा  

६. लाल तिखट - अर्धा चमचा  

७. तेल - २ चमचे 

८. मोहरी, जीरं - १ चमचा  

९. हिंग - चिमूटभर 

कृती -

१. कैरी आणि कांदा साले काढून किसून घ्यायचे.

२. यामध्ये गूळ, मीठ, तिखट आणि दाण्याचा कूट घालायचे

३. अर्धा तास हे मिश्रण असेच ठेवले की याला पाणी सुटायला सुरुवात होते. 

४. मग छोट्या कढईमध्ये तेल घालून त्यात मोहरी, जीरं, हिंग यांची फोडणी करुन ती यावर घालायची. 

५. कैरी आणि गुळामुळे आंबट-गोड आणि कांद्यामुळे झणकेदार अशा चवीची ही चटणी अतिशय छान लागते.

६. पोळी, भात-वरण, पराठा यांच्यासोबत ही चटणी अतिशय छान लागते.   

टिप - किसलेले आवडत नसेल तर फोडी करुन तुम्ही ही चटणी मिक्सरमधूनही फिरवू शकता. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.