Join us

उन्हाळ्यात जेवण जात नाही, करा तोंडाची चव वाढवणारा कैरीचा आंबटगोड मेथांबा! जेवा दोन घास जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2022 13:00 IST

कैरीची डाळ, पन्हे, कैरीचे ताजे लोणचे म्हणजेच तक्कू असं काही ना काही आपण करतोच. याबरोबरच साखरांबा, गुळांबा, मेथांबा हे प्रकारही आवर्जून केले जातात.

ठळक मुद्देहा आंबट-गोड थोडासा तिखट मेथांबा जेवणाची लज्जत वाढवतो यात वादच नाही. मेथ्या चवीला कडवट असल्या तरी त्य़ा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. 

बाजारात कैऱ्या यायला लागल्या की आपल्याला कैऱ्यांचे काय करु आणि काय नको असे होऊन जाते. कैरीची डाळ, पन्हे, कैरीचे ताजे लोणचे म्हणजेच तक्कू असं काही ना काही आपण करतोच. याबरोबरच साखरांबा, गुळांबा, मेथांबा हे प्रकारही आवर्जून केले जातात. वर्षातून एकदाच येणाऱ्या या कैऱ्या म्हणजे तोंडाला चव आणण्याचा एक महत्त्वाचा पदार्थ. उन्हाळ्यात शरीराची लाहीलाही होत असते त्यामुळे अनेकदा तोंडाची चव जाते. त्यामुळे आपल्याला भर उन्हात जेवणही जात नाही. पण तोंडी लावायला आंबट-गोड कैरीचे पदार्थ असले की जेवणाची लज्जत आपसूकच वाढते. इतकंच नाही तर यामुळे जेवण दोन घास जास्तच जाईल. पाहूयात हा आंबट गोड मेथांबा कसा करायचा...

(Image : Google)

साहित्य - 

१. कैऱ्या - २ ते ३ २. तेल - २ चमचे ३. मोहरी - अर्धा चमचा४. हिंग - पाव चमचा५. हळद - अर्धा चमचा६. तिखट - अर्धा चमचा७. मीठ - अर्धा चमचा८. गूळ - १ ते १.५ वाटी९.मेथ्या - १ चमचा 

(Image : Google)

कृती - 

१. कैरीची साले काढून त्याच्या बारीक फोडी करुन घ्यायच्या. २. कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मोहरी तडतडली की हिंग हळद घालायचे३. या फोडणीत मेथ्या घालून त्या चांगल्या परतून घ्यायच्या, त्यात तिखट घालायचे.४. कैरीचे काप या फोडणीत घालून त्यावर मीठ घालून सगळे एकत्र हलवून घ्यायचे.५. पाव कप पाणी घालून हे सगळे झाकण ठेवून शिजवायचे, त्यामुळे मेथ्यांचा फ्लेवर उतरतो. ६. ७ ते ८ मिनीटांनी झाकण काढल्यावर कैरी मऊ झालेली असेल. त्यामध्ये गूळ घालायचा आणि सगळे पुन्हा एकजीव करायचे. ७. गुळ हळूहळू यामध्ये वितळतो आणि छान एकजीव होतो. ८. पुन्हा ४ ते ५ मिनीटे झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा.९. मेथ्या चवीला कडवट असल्या तरी त्य़ा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. १०. हा आंबट-गोड थोडासा तिखट मेथांबा जेवणाची लज्जत वाढवतो यात वादच नाही. 

टॅग्स :अन्नपाककृतीआंबाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.