Lokmat Sakhi >Food > प्रोटीन हवं तर मशरुम खा, मशरूम खाण्याचे ४ फायदे, झटपट होणाऱ्या ३ रेसिपी...

प्रोटीन हवं तर मशरुम खा, मशरूम खाण्याचे ४ फायदे, झटपट होणाऱ्या ३ रेसिपी...

मशरुम सहसा न खाल्ली जाणारी गोष्ट, पण जेवणाची लज्जत वाढवणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले मशरुम आवर्जून खायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 01:02 PM2022-07-01T13:02:46+5:302022-07-01T13:08:20+5:30

मशरुम सहसा न खाल्ली जाणारी गोष्ट, पण जेवणाची लज्जत वाढवणारे आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले मशरुम आवर्जून खायला हवे.

If you want protein, eat mushrooms, 4 benefits of eating mushrooms, 3 instant recipes ... | प्रोटीन हवं तर मशरुम खा, मशरूम खाण्याचे ४ फायदे, झटपट होणाऱ्या ३ रेसिपी...

प्रोटीन हवं तर मशरुम खा, मशरूम खाण्याचे ४ फायदे, झटपट होणाऱ्या ३ रेसिपी...

Highlightsझटपट होणारे आणि भरपूर पोषण देणारे मशरुमचे पदार्थ आवर्जून खायला हवेत भाजीला उत्तम पर्याय ठरु शकते मशरुम करी, सोपी आणि मस्त रेसिपी...

काहींना मशरुम खूप आवडतं तर काहींना अजिबात आवडत नाही. मशरुम (Mushroom) ही काय खायची गोष्ट आहे का असंही अनेकांना वाटतं. घरात अजिबात मशरुम न खाणारे हॉटेलमध्ये गेल्यावर मात्र वेगवेगळ्या पदार्थांतील मशरुम अगदी आवडीने खातात. मशरुममध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी दूर होऊन तब्येत चांगली राहण्यास मदत होते. भाजीपेक्षा काहीसं वेगळं असलं तरी मशरुम चवीला चांगले लागते. पिझ्झा, पास्ता, सूप, भाजी यांसारख्या पदार्थांमध्ये मशरुमचा आवर्जून वापर केला जातो Mushroom Recipes . पावसाळ्याच्या सिझनमध्ये बाजारात हमखास मिळणाऱ्या या मशरुमचे नेमके काय फायदे होतात ते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. मशरुममध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटसमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून आपली सुटका होते.

२. मशरुममध्ये कार्बोहायड्रेटसचं तसेच कॅलरीजचे प्रमाण कमी असतं त्यामुळे ज्यांचे वजन जास्त आहे त्यांना वजन कमी करण्यासाठी मशरुम खाण्याचा फायदा होतो. 

३. मशरुममध्ये असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच यातून बरीच ऊर्जा मिळत असल्याने कायम तरुण आणि ताजेतवाने राहण्यासाठी, डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मशरुमचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

४. मशरुममध्ये लोह, खनिजे, जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन चांगल्या प्रमाणात असते. हे सगळे घटक हाडांसाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे हाडांना मजबुती मिळण्याचे आणि हाडे चांगले राहण्याचे काम मशरुमच्या माध्यमातून होते. 

मशरुम सूप 

१. मशरुम स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करुन घ्यायचे.
२. कढईत तेल घालून त्यात आलं-लसूण पेस्ट करुन घालायची. 
३. यामध्ये मशरुम, मीठ, मिरपूड घालून भरपूर पाणी घालायचे. 
४. याला चांगली उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचे. 
५. आवडत असेल तर तुम्ही यामध्ये फरसबी, गाजर, कोबी अशा भाज्याही चिरुन घालू शकता. 
६. गार झाल्यावर या सूपमध्ये लिंबू पिळायचे आणि थोडी कोथिंबीर घालून गरमागरम सूप प्यायचे.

२. मशरुम करी 

१. आपण ज्याप्रमाणे काजू, पनीर मिक्स व्हेज यांची भाजी करतो त्याचप्रमाणे मशरुमचीही भाजी करु शकतो. 
२. कांदा, टोमॅटो, काजू, आलं, लसूण यांची मिक्सरमध्ये ग्रेव्ही करुन घ्यायची. 
३. मशरुमचे बारीक तुकडे करुन घ्यायचे. 
४. याबरोबरच शिमला मिरची, पनीर, कॉर्न असे काही असेल तरी चांगले लागते. 
५. कढईत फोडणी करुन त्यामध्ये आधी ग्रेव्ही घालून ती चांगली परतून घ्यायची. 
६. त्यामध्ये लाल तिखट, धनेजीरे पावडर, पनीर मसाला, मीठ सगळे घालून चांगले शिजवून घ्यायचे. यात मशरुम आणि इतर भाज्या घालून अंदाजे पाणी घालून शिजवायचे.
७. ही भाजी पोळी, पुरी, रोटी, जीरा राईस अशा कशासोबतही छान लागते.  

(Image : Google)
(Image : Google)

३. मशरुम पुलाव

१. आपण भाज्या घालून ज्याप्रमाणे पुलाव करतो तसाच हा पुलाव करायचा.
२. कढईत फोडणी घालून त्यामध्ये जीरे, तमालपत्र, काळी मिरी, लवंग, दालचिनी असे मसाल्याचे पदार्थ घालायचे.
३. मशरुमचे तुकडे आणि आपल्या आवडीच्या इतर बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या.
४. यामध्ये तांदूळ घालून चांगले परतून घ्यायचे. यामध्ये मीठ आणि चवीपुरती मीरपूड घालून अंदाजे पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची.
५. उकळी आल्यावर गॅस बारीक करुन भात चांगला शिजू द्यायचा. 
६. भरपूर कोथिंबीर घालून गरम पुलाव खायला घ्यायचा. यासोबत एखादे रायते केले तरी चांगले लागते. 

Web Title: If you want protein, eat mushrooms, 4 benefits of eating mushrooms, 3 instant recipes ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.