Join us

व्हाइट मोमो तर नेहमी खातो, ग्रीन मोमो खाल्लेत कधी? चविष्ट रेसिपी, खा गरमगरम वाफाळते मोमो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2022 11:32 IST

Green Momo's Recipe मोमोजचे विविध प्रकार ट्राय करून पाहिले असतीलच, आता ग्रीन मोमोज करून पाहा..

सध्या फास्ट फूड खाण्याचा जणू ट्रेण्ड सुरु आहे. प्रत्येक गल्लोगल्लीत फास्ट फूडचे स्टॉल आणि दुकाने दिसून येतात. संध्याकाळची छोटी भूक भागवण्यासाठी या दुकानांवर प्रचंड गर्दी निर्माण होते. तरुणाई सध्या मोमोजची दिवानी झाली आहे. मोमोजमध्ये विविध प्रकार मिळतात जसे स्टीम मोमो, तंदुरी मोमो असे बरेच प्रकारचे मोमो लोकं चवीने खातात. तुम्हाला जर घरच्याघरी मोमो बनवायचे असतील तर, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण ग्रीन मोमोज बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.

ग्रीन मोमोज बनवण्यासाठी लागणारं साहित्य

दोन वाट्या मैदा 

एक वाटी पालक 

एक वाटी किसलेलं गाजर

एक वाटी किसलेलं बीट

एक वाटी बारीक चिरलेला कोबी

एक वाटी किसलेलं पनीर

दोन बारीक चिरलेल्या मिरच्या

एक चमचा किसलेलं आलं

दोन चमचे मिरीपूड

दोन चमचे सोया सॉस

चवीनुसार मीठ

तेल

कृती

सर्वप्रथम, मिक्सरमधून पालकाची चांगली पेस्ट तयार करा. नंतर एका मोठ्या बाउलमध्ये मैदा घ्या. त्यात एक चमचा तेल, चवीनुसार मीठ, पालक पेस्ट आणि पाणी घालून मिक्स करा आणि पीठ मळून घ्या. मळलेले पीठ एका ओलसर मलमलच्या कपड्यात अर्धा तास झाकून ठेवा. मोमोजची स्टफिंग तयार करण्यासाठी कढईत तेल गरम करा. त्यात किसून घेतलेलं आलं, बारीक चिरलेल्या मिरच्या परतवून घ्या. 

परतल्यानंतर त्यात सगळ्या भाज्या टाकून चांगले मिक्स करा. त्यात मिरीपूड, सोया सॉस आणि चवीनुसार मीठ टाकून चांगले एकजीव करा. या मिश्रणावर झाकण ठेवा वाफ येऊपर्यंत भाज्यांना ५ मिनिटे शिजवून घ्या. सर्वात शेवटी पनीर कुस्कुरून त्यात टाका. आणि सारण एका बाउलमध्ये काढून ठेवा. नंतर मळलेल्या पीठाचे गोळे तयार करा. त्या गोळ्यांचे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या. त्यात दोन चमचे स्टफिंग भरून मोमोजचा आकार द्या. स्टीमच्या भांड्यात सगळे मोमोज चांगले वाफवून घ्या. अशाप्रकारे ग्रीन मोमोज खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नमोमो चॅलेंजकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स