सकाळ असो वा संध्याकाळ, पावसाची रिमझिम असो वा कडाक्याची थंडी...भारतीयांसाठी 'चहा' हे फक्त एक पेय नसून ती एक भावना आहे. आपण कितीही हाय-फाय कॅफेमध्ये गेलो, तरी रस्त्यावरच्या टपरीवर मिळणाऱ्या त्या 'कडक' चहाची सर कशालाच येत नाही. टपरीवरच्या चहाचा तो विशिष्ट सुगंध आणि घट्ट दाटसरपणा आपल्या घरातील चहात का येत नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण काळजी करू नका! टपरीवरचा तोच अस्सल चवीचा फक्कड चहा आता घरच्याघरीच सहज तयार करु शकता. चहा तयार करतांना पाणी आणि दुधाचे प्रमाण किती असावे आणि चहा उकळण्याची योग्य पद्धत कोणती हे देखील माहीत असणे गरजेचे असते(Ideal milk & water ratio to make perfect chai taste).
टपरीवर मिळणारा चहा म्हणजे अनेकांसाठी दिवसाची परफेक्ट सुरुवात! त्या चहाची खास चव, गडद रंग आणि दरवळ घरच्या घरी चहा केला तरी येत नाही, असं आपल्याला वाटतं. पण योग्य पद्धत, अचूक प्रमाण आणि काही सोप्या टिप्स वापरल्या तर टपरीसारखा भन्नाट चहा अगदी घरच्याघरी तयार करता येतो. चहा तयार करताना दूध – पाणी किती असावं, चहा पावडर कधी घालावी आणि उकळी किती वेळ द्यावी, या छोट्या गोष्टी चहाची चव पूर्णपणे बदलू शकतात. टपरीवर मिळतो तसाच कडक आणि स्वादिष्ट चहा घरी कसा करायचा (perfect chai milk water ratio) याच्या कशी खास टिप्स पाहूयात.
टपरीवर मिळतो तसाच कडक चहा करण्याचे सिक्रेट...
१. दूध आणि पाण्याचे अचूक प्रमाण....
टपरीवरचा चहा घट्ट आणि चविष्ट असण्याचे मुख्य कारण म्हणजे दूध आणि पाण्याचे योग्य व अचूक प्रमाण. १ कप चहासाठी १/२ कप पाणी आणि १/२ कप दूध हे प्रमाण उत्तम मानले जाते. जर तुम्हाला चहा अधिक घट्ट आणि मलाईदार हवा असेल, तर १/३ भाग पाणी आणि २/३ भाग दूध वापरावे. (उदा. अर्ध्या कपापेक्षा थोडे कमी पाणी आणि पाऊण कप दूध). नेहमी चहासाठी फुल क्रीम किंवा फुल फॅट्स असलेल्याच दुधाचा वापर करा. गाईच्या पातळ दुधापेक्षा म्हशीच्या दुधाने चहाला टपरीसारखी चव येते.
टपरीवरच्या चहासाठी ५ 'प्रो' टिप्स...
१. चहा पावडर कधी टाकावी :- पाणी आधी चांगले उकळू द्या, त्यानंतरच त्यात साखर आणि चहा पावडर टाका. पाणी न उकळता पावडर टाकल्यास चहाचा अर्क व्यवस्थित उतरत नाही.
२. आले आणि वेलची घाला :- आले कधीही किसून टाकू नका, तर ते खलबत्त्यात ठेचून टाका. आले आणि वेलची चहा पावडरसोबतच उकळत्या पाण्यात टाका, जेणेकरून त्याचा अर्क दुधात जाण्यापूर्वी पाण्यात नीट मिसळेल.
३. दूध टाकल्यानंतर :- दूध टाकल्यानंतर चहा फक्त एक उकळी काढून बंद करू नका. चहा मंद आचेवर किमान ४ ते ५ मिनिटे उकळू द्या. टपरीवर चहा सतत मोठ्या पातेल्यात उकळत असतो, त्यामुळेच त्याला तो विशिष्ट रंग आणि घट्टपणा येतो.
वाटीभर दलियाचा करा मस्त कुरकुरीत डोसा-वजनही घटेल आणि खाऊन पोटही भरेल आनंदाने-पाहा रेसिपी...
४. 'सिक्रेट' मसाला :- टपरीवर अनेकदा चहात थोडीशी दालचिनी किंवा गवती चहा घातला जातो. चवीत बदल म्हणून तुम्हीही याचा वापर करू शकता.
५. साखरेचे प्रमाण :- टपरीवरचा चहा थोडा गोडसर असतो. साखर सुरुवातीलाच टाकल्यामुळे ती चहा पावडरसोबत कॅरेमलाइज (Caramelized) होते, ज्यामुळे चहाला गडद रंग येतो.
