Bittergourd : फार कमी लोक असतील ज्यांना कारली खाणं आवडतं. पण ज्यांना कारली आवडतात ते याची भाजी खाण्याची संधी अजिबात सोडत नाही. सगळ्यांनाच माहीत आहे की, कारले कडू लागतात. याच कारणानं बरेच लोक कारले पाहून नाक मुरडतात. कारले कडू लागत असले तर आरोग्याला याचे भरपूर फायदे मिळतात. कारल्यांमध्ये व्हिटामिन ए, फायबर, व्हिटामिन सी, आयर्न, मॅग्नेशिअम आणि वेगवेगळे अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात.
तुम्ही सुद्धा कारली कडू लागतात म्हणून खात नसाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही कारल्याचा कडवटपणा दूर करू शकता. सोबतच या टिप्सनं कारल्याच्या भाजीची टेस्ट आणखी वाढू शकेल.
मिठानं करा कडवटपणा दूर
मिठानं तुम्ही कारल्याचा कडवटपणा सहजपणे कमी करू शकता. ही एक सोपी आणि सगळ्यात फेमस पद्धत आहे. आधी कारली धुवून चांगले कापून घ्या. आता यात चिमुटभर हळद आणि थोडं मीठ टाकून मिक्स करा. अर्ध्या तासासाठी हे तसंच ठेवा. मीठ लावून ठेवल्यानं कारली पाणी सोडतात. ज्यामुळे त्यातील कडवटपणा कमी होतो. नंतर कारले पाण्यानं धुवून घ्या. कारली भाजी करण्यासाठी तयार आहेत.
दह्यानं कडवटपणा घालवा
कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता. यासाठी कारली कापून अर्धा तास फेटलेल्या दह्यात भिजवून ठेवा. यानं कारल्याचा कडवटपमा कमी होईल. सोबतच कारल्यात आंबट-गोड टेस्टही येईल. नंतर कारल्याची भाजी करण्याआधी कारले धुवून घ्या. त्यानंतर भाजी करा.
उकडल्यानं कमी होईल कडवटपणा
कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी तुम्ही कारले गरम पाण्यात उकडू शकता. हा सुद्धा एक प्रभावी उपाय आहे. यासाठी कारली कापून एका भांड्यात टाका आणि त्यात पाणी टाकून ५ ते १० मिनिटांसाठी उकडा. आता त्यात दोन चमचे मीठ आणि अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. कारले पाण्यात उकडल्यानं हलके नरम होतात आणि त्यातील कडवटपणा निघून जातो. नंतर हे कारली पाण्यातून काढून भाजी बनवू शकता.
लिंबू आणि चिंचेचं मिश्रण
कारल्याचा कटवटपणा कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि चिंचेचा देखील वापर करू शकता. यानं कारल्याची टेस्टही वाढेल. लिंबू आणि चिंचेमध्ये नॅचरल अॅसिड असतं, जे कारल्याचा कडवटपणा कमी करतं. कारले कापून झाल्यावर त्याल लिंबाचा रस आणि चिंच टाकून १० ते २० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पाण्यात धुवून भाजी करा.