Join us

भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून करा ४ गोष्टी, भेंडीची भाजीही लागेल चमचमीत-चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2023 12:29 IST

How To Prevent Sticky Bhindi : भाजी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास भाजी चांगली मोकळी होते

ठळक मुद्देभेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून सोप्या टिप्स, भाजी होईल छान मोकळीचिकट झाली की भेंडी खायला अजिबात नको होते..

भेंडी ही अनेकांच्या आवडीची भाजी. झटपट होणारी आणि चविलाही छान लागणारी ही भाजी आपण नेहमी करतो. कधी ही भाजी छान मोकळी होते तर कधी ती एकदम चिकट होते आणि ती खायला अजिबात नको वाटते. भेंडीची भाजी आपण कधी कांदा, दाण्याचा कूट आणि गोडा मसाला घालून, कधी नुसतीच मिरची आणि धणे-जीरेची पूड घालून तर कधी भरली भेंडी अशी वेगवेगळ्या प्रकारांनी करतो. भेंडी आरोग्यासाठी चांगली असल्याने त्याचा आहारात जरुर समावेश करावा असेही सांगितले जाते (How To Prevent Sticky Bhindi). 

भाजीच नाही तर भेंडी फ्राय किंवा कुरकुरी भेंडी हाही स्नॅक म्हणून अनेकांच्या आवडीचा प्रकार. भेंडी चिकट होण्यामागे काही विशिष्ट कारणं असतात. भेंडी खरेदी करताना, ती धुताना आणि प्रत्यक्ष भाजी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास ही भाजी चिकट न होता चांगली मोकळी होते आणि खायलाही चांगली लागते. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी काही खास टिप्स आपल्याशी शेअर करतात त्या कोणत्या, पाहूया... 

(Image : Google)

१. भेंडी खरेदी करताना कधी भेंडीचे देठ तोडून पाहायचे. हे देठ एका प्रयत्नात लगेच तुटले तर ती भेंडी कोवळी आणि ताजी असते. पण हे देठ मऊ पडले असेल आणि ते लगेच तुटले नाही तर मात्र ही भेंडी जुनी आहे असे समजावे. अशा भेंडीमध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे भेंडी खरेदी करतानाच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. 

२. भेंडीची भाजी करताना आपण भेंडी स्वच्छ धुवून मग ती पुसून घेतो. पुसल्यानंतर भाजी लगेच फोडणीला टाकण्याऐवजी काही वेळ तशीच ठेवावी. त्यामुळे चिरलेल्या भेंडीला चांगली हवा लागते आणि ती मोकळी होण्यास मदत होते. 

३. इतकेच नाही तर भेंडीची भाजी करताना त्यामध्ये लिंबू, आमसूल असा आंबट असणारा घटक घालावा. यामुळे भाजीला चिकटा न येता ती चांगली मोकळी होण्यास मदत होते. आंबट पदार्थामुळे त्यात एकप्रकारची रासायनिक प्रक्रिया घडते आणि ही भाजी छान मोकळी होते. 

४. आंबट पदार्थ घातला की किंवा भाजीला चव येण्यासाठी आपण त्यामध्ये थोडी साखर किंवा गूळ घालतो. भेंडीच्या भाजीत आपण साधारणपणे गूळ न घालता अर्धा चमचा साखरच घालतो. पण ही साखर भाजी शिजत असताना घातली तर भाजी जास्त चिकट होते. त्याऐवजी भाजी शिजल्यावर गॅस बंद केल्यानंतर वरुन साखर घालावी. त्यानंतर वाफेसाठी झाकण ठेवावे, वाफेवर साखर मुरते. ताटात वाढताना भाजी थोडी हलवून घ्यावी.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.