Join us

Mango Preservation: आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्यासाठी ३ खास टिप्स, रस खा हवा तेव्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2022 16:36 IST

How To Preserve Mango Juice: आमरस खूप आवडतो ना? अगदी वर्षभर पुरवून पुरवून खावा वाटतो? मग टिकवून ठेवा वर्षभर आणि हवा तेव्हा खा आमरस!

ठळक मुद्देकोणतेही केमिकल्स न वापरता आपण आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवू शकतो. यासाठी हापूस किंवा केशर आंबा वापरावा.

फळांचा राजा आंबा न आवडणारा क्वचितच एखादा कुणी सापडेल. प्रत्येकालाच हवंहवंसं वाटणारं हे फळ वर्षभरातून अवघे दिड- दोन महिने खायला मिळतं. पण तेवढ्यात अनेकांचं समाधान होत नाही. दररोज आमरस खाल्ला तरी अगदी अजून काही दिवस  आंब्याचा हंगाम असायला हवा होता, असं राहून  राहून  वाटतं. म्हणूनच तर मँगो लव्हर्ससाठी ही खास रेसिपी. आंब्याचा रस वर्षभर टिकवून (how to preserve mango juice naturally?) ठेवण्यासाठी खास  टिप्स.. कोणतेही केमिकल्स (chemical preservatives) न वापरता आपण आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवू शकतो. जेव्हा गरज  पडेल  तेव्हा अवघ्या काही मिनिटांत आमरस किंवा मँगो शेक तयार.. यासाठी हापूस किंवा केशर आंबा वापरावा.

 

आंबा वर्षभर टिकवून ठेवण्याच्या पद्धती१. आंब्याचे क्युब (mango cubes)आमरस न करता आंब्याचे क्युब करून तुम्ही आंबा टिकवून ठेवू शकता. यासाठी आंब्याच्या फोडी करा.  त्यावर अलगद काप देऊन आंब्याच्या गराचे चौकोनी क्युब करून घ्या. हे क्युब एका भांड्यात जमा करा. एक कप आंब्याचे क्युब असतील तर त्यात एक टेबलस्पून साखर टाका. हे क्युब आता एका झिपलॉक बॅगमध्ये टाका. बॅग पुर्णपणे लॉक करण्याआधी तिच्या एका कोपऱ्यात स्ट्रॉ टाका. स्ट्रॉ ने बॅगमधली सगळी हवा काढून घ्या आणि आता बॅग पुर्णपणे लॉक करा. अशा छोट्या छोट्या प्लॅस्टिक बॅगमध्ये आंब्याचे क्युब भरून ठेवा आणि या सगळ्या बॅग एअरटाईट कंटेनरमध्ये टाकून फ्रिजरमध्ये स्टोअर करा. 

 

२. आंब्याचा रस (mango pulp)- आंब्याचा रस करा. एक कप रस असेल तर एक टेबलस्पून साखर या हिशोबाने साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या. पिठीसाखरही घालू शकता. साखरेमुळे आंब्याचा रंग आणि चव जशीच्या तशी राहते.हा रस आता झिपलाॅक बॅगमध्ये भरा. बॅग अगदी काठोकाठ भरू नका. त्यातली हवा काढून घ्या आणि त्यानंतर बॅग पुर्णपणे लॉक करा. या बॅग एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रिजरमध्ये स्टोअर करा.- आंब्याचा रस प्रिझर्व्ह करण्याची दुसरी पद्धत म्हणजे आंब्याचा रस करून तो बर्फाच्या ट्रेमध्ये टाका. ४ ते ५ तास फ्रिजरमध्ये ठेवल्यानंतर त्याचे क्युब तयार होतील. हे क्युब नंतर काढा आणि ते झिपलॉक बॅगमध्ये टाकून ठेवा. स्ट्राॅच्या मदतीने हवा काढून घ्या आणि त्यानंतर बॅग लॉक करा. ही बॅग एअरटाईट डब्यात ठेवून फ्रिजरमध्ये स्टोअर करा. 

 

या गोष्टी लक्षात ठेवा- आंबा प्रिझर्व्ह करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत त्याला पाणी कुठेही लागणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे हात, भांडे सगळे अगदी कोरडे हवे. पाण्याचा अंश जरी लागला तरी रस काही दिवसांतच खराब होईल.- जेव्हा प्रिझर्व्ह केलेला आंब्याचा रस वापरायला काढाल, तेव्हा जेवढा पाहिजे तेवढाच रस काढा. तो काढतानाही तुमचा हात, चमचा अगदी कोरडे पाहिजे. उरलेला रस पुन्हा लगेचच फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवा. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आंबा