अनेकदा भात उरतो आणि त्याला फोडणी देऊन फोडणीचा भात खायचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो. उरलेल्या भातापासून फक्त फोडणीचा भात न बनवता तुम्ही कमीत कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारा उत्तप्पा बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. भात आणि रव्याचं हे मिश्रण तुमच्या कुटूंबातील सदस्यांना नक्की आवडेल. (How To Make Uttapam Of Leftover Rice)
उरलेल्या भाताचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य
१) उरलेला भात- १ वाटी
२) रवा- अर्धी वाटी
३) दही- पाव वाटी
४) पाणी - गरजेनुसार
५) मीठ- चवीनुसार
६) इनो किंवा बेकिंग सोडा- अर्धा चमचा
७) टॉपिंगसाठी तुम्ही बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि गाजर घालू शकता.
भाताचा डोसा करण्याची सोपी कृती
उरलेला भात मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात दही आणि थोडं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट जास्त घट्ट नसावी. ही पेस्ट एका भांड्यात काढा. या पेस्टमध्ये रवा आणि चवीनुसार मीठ घाला.
गुठळ्या न होऊ देता सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्या. गरज वाटल्यास त्यात थोडं पाणी घाला. उत्तप्प्याचे बॅटर डोश्याच्या बॅटरपेक्षा थोडं घट्ट असावं. हे मिश्रण १० ते १५ मिनिटं झाकून बाजूला ठेवा.
१० ते १५ मिनिटांनी मिश्रण घट्ट वाटल्यास त्यात थोडं पाणी घालून पुन्हा ढवळून घ्या. त्यात इनो घालून त्यावर एक चमचा पाणी घाला. इनो सक्रिय होताच बॅटर हळूवारपणे एकाच दिशेनं मिक्स करा.
नॉन स्टिक तवा मध्यम आचेवर गरम करा. तव्यावर एक डाव बॅटर घाला आणि जाडसर गोल आकारात पसरवा. बॅटरवर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची घालून हलकं दाबून घ्या. कडांवर थोडं तेल सोडा, मंद ते मध्यम आचेवर उत्तप्पा पलटून घ्या आणि दुसऱ्या बाजूनंही खरपूर भाजून घ्या. गरमागरम उरलेल्या भाताचा उत्तप्पा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
