Paan Sharbat Recipe : उन्हाळा लागला की, मुलांच्या शाळांना सुट्टी असते. अशात लोक सुट्टी घालवण्यासाठी आपल्या नातेवाईकांकडे जातात-येतात. त्यामुळे या दिवसांमध्ये नातेवाईकांचं स्वागत करण्यासाठी वेगवेगळे ड्रिंक्स तयार केले जातात. तुम्हाला आठवत असेल की, पाहुण्यांचं स्वागत पान खायला देऊन केलं जातं. बऱ्याच लोकांना पान खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहीत नसेल की, उन्हाळ्यात तुम्ही पानाचं एक टेस्टी वेगळं सरबतही बनवू शकता. या खास सरबतानं तुमच्या शरीराला थंडावा सुद्धा मिळेल.
अनेकांना हे माहीत नसतं की, खायच्या पानामध्ये अनेक पोषक तत्व सुद्धा असतात. ज्यांमुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पानांमध्ये व्हिटामिन सी, ए तसेच आयर्न, कॅल्शिअमसहीत अनेक गुण असतात. त्यामुळे पान खाल्ल्यानं टेस्ट तर मिळतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
उन्हाळा म्हटला की, जास्तीत जास्त लोक बाहेर बाजारात मिळणारे वेगवेगळे कोल्ड ड्रिंक्स घरात स्टोर करून प्यायले जातात, जे शरीराला डिहायड्रेट करतात. अशात या दिवसात असे ड्रिंक्स प्यायला हवे जेणेकरून शरीर हायड्रेट राहील.
पानाचं सरबत बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी
उन्हाळ्यात पानाचं खास सरबत बनवण्यासाठी तुम्हाला केवळ 25 ते 30 मिनिटांचा वेळ लागेल. एक बॉटल सरबत बनवण्यासाठी सगळ्यात आधी साधारण 20 पानं घ्या. तसेच 200 ग्रॅम गुलकंद, 100 ग्रॅम भिजवलेली बडीशेप, 7 ते 8 वेलची, एका लिंबाचा रस, दोन कप साखर.
कसं बनवाल?
सगळ्यात आधी पानं धुवून घ्या आणि ते गुलकंदासोबत बारीक करा. त्यात वेलची, बडीशेप मिक्सरमध्ये टाकून बारीक करा. त्यानंतर एका भांड्यात साडेतीन कप पाणी टाकून त्यात साखर टाका. हे पाणी चांगलं उकडू द्या. साखर पूर्ण विरघळल्यानंतर त्यात पानं, गुलकंद, वेलची आणि बडीशेपचं मिश्रण टाका. हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात लिंबाचा रस आणि चिमुटभर हिरवा रंग टाका. हे दोन मिनिटं शिजवा आणि काचेच्या एअर टाइट बॉटलमध्ये स्टोर करा.
कसं प्याल?
एका ग्लासमध्ये पानाचं तीन चमचे सिरप टाका. नंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि पाणी मिक्स करा. तुमचं पानाचं खास सरबत तयार आहे. हे सिरप पाण्यात टाकून पिण्याऐवजी तुम्ही दुधात टाकूनही पिऊ शकता.