Join us

Sabudana Paratha Recipe: साबुदाणा पराठा! शेफ कुणाल कपूर यांची उपवास स्पेशल रेसिपी, खा पोटभर आणि पौष्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 14:47 IST

Food And Recipe: साबुदाणा खिचडी, भगर- आमटी नेहमीचीच... यावेळी उपवासाला (special recipe for fast) करून बघा साबुदाणा पराठा.. असा चवदार पराठा की उपवास नसताना एरवीही चवीने खाल...

ठळक मुद्देमुलांना साबुदाण्याचा खमंग पराठाही नक्कीच आवडू शकतो. शाळेत डब्यात देण्यासाठीही साबुदाणा पराठा उत्तम आहे. 

उपवासाच्या दिवशी नेहमीच आपण आपले पारंपरिक पदार्थ करतो. कधी साबुदाण्याची खिचडी तर कधी भगर- आमटी.. निवांत वेळ असला तर मग साबुदाण्याचे गरमागरम वडेही अधून मधून तळले जातातच.. याशिवाय मग भाजणीच्या पीठांची थालिपीठं..बटाट्याचा किस असे पदार्थही कधीतरी प्लेटमध्ये येतात.. आता यापेक्षाही काहीतरी वेगळं आणि झकास खाण्याची इच्छा असेल तर चैत्र नवरात्रीच्या उपवासाला किंवा इतर कोणत्याही उपवासाला गरमागरम साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe) करून बघा..

 

साबुदाणा पराठा करण्याची ही रेसिपी प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर (Chef Kunal Kapur) यांनी इन्स्टाग्रामला शेअर केली आहे. हा पराठा पौष्टिक असल्याने तुम्ही उपवास नसतानाही तो करू शकता. साबुदाण्याची खिचडी हा बऱ्याच मुलांचा अतिशय आवडीचा पदार्थ. त्यामुळे मुलांना साबुदाण्याचा खमंग पराठाही नक्कीच आवडू शकतो. शाळेत डब्यात देण्यासाठीही साबुदाणा पराठा उत्तम आहे. 

 

साबुदाणा पराठा करण्यासाठी लागणारे साहित्य१ वाटी भिजवलेला साबुदाणा, १ उकडलेला बटाटा, मिरच्या, लाल तिखट, तूप, दाण्याचा कुट, चवीनुसार मीठ.साबुदाणा पराठा रेसिपी (Recipe)- नेहमीप्रमाणे खिचडी करण्यासाठी भिजवता तसा साबुदाणा भिजवून घ्या.-  साबुदाणा भिजला की त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त साबुदाणा मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करून घ्या.- आता एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, साबुदाणा, मिक्सरमधून फिरवलेला साबुदाणा, मिरचीचे बारीक तुकडे, दाण्याचा कुट आणि चवीनुसार मीठ टाका.

- हे सगळे मिश्रण व्यवस्थित मळून घ्या. पाणी टाकण्याची गरज नाही. उकडलेल्या बटाट्याचा ओलसरपणा आणि साबुदाण्याचा ओलसरपणा यामुळे पीठ छान एकत्र होईल.- आता एका स्वच्छ प्लॅस्टिक बॅगवर पीठाचा लहानसा गोळा ठेवा आणि तूप लावून तो व्यवस्थित थापून घ्या.- तवा गरम झाला की त्यावर तूप सोडा आणि त्यावर साबुदाण्याचा पराठा टाकून खालून- वरून खमंग भाजून घ्या. पराठा भाजताना त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून तो चांगला वाफवला जाईल. - गरमागरम पराठा खाण्यासाठी झाला तयार. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूरइन्स्टाग्राम