'पनीरची भाजी' म्हटली की आपल्याला पनीर टिक्का किंवा पनीर बटर मसाला अशा पनीरच्या वेगवेगळ्या भाज्या डोळ्यांसमोर येतात. पण जर आपल्याला हॉटेल किंवा ढाब्यावर मिळते तशी काहीतरी हटके आणि चविष्ट रेसिपी घरी तयार करायची असेल, तर 'पनीर खिमा मसाला' हा एक उत्तम पर्याय आहे. पनीर हा शाकाहारी जेवणातील सर्वांचाच आवडता पदार्थ... पण नेहमीच्याच पनीरच्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर 'पनीर खिमा मसाला' ही डिश नक्की ट्राय करून पाहा... मऊ लुसलुशीत पनीर, कांदा-टोमॅटोची ग्रेव्ही आणि वरून बटरचा तडका... हा बेत कोणाला आवडणार नाही...(How To Make Paneer Kheema Masala At Home)
घरच्यांच्या खास फर्माईशसाठी, ही रेसिपी तुमच्या जेवणाची रंगत नक्कीच वाढवेल. घरात उपलब्ध असलेल्या साध्या मसाल्यांपासून तयार होणारा हा पदार्थ चवीला मात्र अतिशय शाही लागतो. हॉटेल किंवा ढाब्यावर मिळते तशीच (Paneer Kheema Masala Recipe) परफेक्ट चवीची, उत्तम ग्रेव्ही आणि टेक्श्चर असणारी ही खास पनीरची चविष्ट डिश तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. आलं - १/२ टेबलस्पून (किसलेल आलं)
२. लसूण - ४ ते ६ पाकळ्या
३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)
४. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
५. पनीर - १ कप (बारीक तुकडे केलेले)
६. तेल - १ टेबलस्पून
७. बटर - १ टेबलस्पून
८. खडे मसाले - १ टेबलस्पून (लवंग, दालचिनी, तमालपत्र, चक्रीफूल)
९. कांदा - १ कप
१०. टोमॅटो - १ कप
११. मीठ - चवीनुसार
१२. बेसन - १/२ टेबलस्पून
१३. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
१४. धणेपूड - १/२ टेबलस्पून
१५. कसुरी मेथी - १/२ टेबलस्पून
१६. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
१७. साजूक तूप - १ टेबलस्पून ( हलकं गरम केलेलं)
१८. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
हॉटेलसारखी परफेक्ट, चटपटीत आणि चव जिभेवर रेंगाळणारी 'तडका डाळ' तयार करण्याची सोपी आणि अचूक रेसिपी...
कृती :-
१. एका मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या एकत्रित घेऊन ते वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
२. एका पॅनमध्ये तेल आणि बटर घेऊन त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्र, चक्रीफूल सारखे खडे मसाले व्यवस्थित परतवून घ्यावे.
३. मग यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालावा, त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरव्या मिरचीची पेस्ट देखील घालावी.
४. या तयार खमंग फोडणीत थोडे बेसन, लाल तिखट मसाला, धणेपूड, कसुरी मेथी, जिरेपूड घालावी. सगळे मिश्रण चमच्याने कालवून त्यात थोडे गरम पाणी घालून एक हलकीशी उकळी काढावी.
५. उकळी आल्यानंतर या मिश्रणात पनीरचे छोटे - छोटे तुकडे घालावेत. ३ ते ५ मिनिटे हलकीशी उकळी आल्यानंतर त्यात वरून हलकेसे गरम केलेलं साजूक तूप आणि लिंबाचा रस तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
अगदी झटपट कमी साहित्यात फारशी मेहेनत न घेता चमचमीत, चटपटीत असा पनीरचा खिमा मसाला खाण्यासाठी तयार आहे. हा पनीर खिमा मसाला आपण गरमागरम चपाती, फुलके किंवा पावासोबत देखील खाऊ शकता.
