Join us

पनीर आणि कचोरी दोन्ही आवडतं? मग करा पनीर कचोरी.. चवीला भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2022 18:45 IST

पनीर आणि कचोरी या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा एकत्रित स्वाद घेण्यासाठी पनीर कचोरी (paneer kachori) करावी. मधल्या वेळेच्या स्नॅक्ससाठीचा (snacks food) वेगळा पदार्थ 

ठळक मुद्देपारीसाठी मैदा आणि रवा एकत्रित किमान तासभर आधी मळून घ्यावं.कचोरी जास्त पातळ लाटू नये. कचोरी तळताना गॅसची आच मोठी असू नये. मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्याव्यात. 

मधल्या वेळेत चटपटीत खाण्याची भूक भागवण्यासाठी कचोरी (kachori for snacks)  हा उत्तम पदार्थ आहे. विविध प्रकारचे सारण करुन कचोरी करता येते. सणावाराच्या काळात नेहमीचेच पदार्थ जरा वेगळ्या चवीचे खायला मिळालेत तर मजा आणतात. पनीर हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडते. हेच पनीर जर वेगळ्या पध्दतीनं खायचं असल्यास पनीरची कचोरी (paneer kachori)  करावी.  पनीरप्रमाणेच कचोरीही सगळ्यांना आवडते. पनीर आणि कचोरी या दोन्ही गोष्टी एकत्र खायच्या असल्यास पनीर कचोरी करावी. चवीला भारी लागणारी पनीर कचोरी करायला (how to make paneer kachori) एकदम सोपी आहे.

Image: Google 

कशी करावी पनीर कचोरी?

पनीर कचोरी करण्यासाठी दीड कप मैदा, अर्धा कप रवा, 2 मोठे चमचे तेल, 1 मोठा कांदा मध्यम जाडसर चिरुन घेतलेला, अर्धा कप किसलेलं पनीर, अर्धा चमचा बडिशेप, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा कसूरी मेथी, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट, आवडत असल्यास छोटा 1 चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला, तळण्यासाठी तेल आणि चवीपुरती मीठ घ्यावं. 

आधी कचोरीची पारी करण्यासाठी मैदा, रवा, तेल आणि मीठ एकत्र करुन मिश्रण नीट मळून घ्यावं.  पारीसाठी मिश्रण फार सैलसर किंवा घट्टही असू नये. मैदा मळून तो अर्धा ते एक तास झाकून ठेवावा.  मैदा मुरेपर्यंत सारण तयार करुन घ्यावं. सारण तयार करण्यासाठी कढईत थोडं तेल घालून ते गरम करावं. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि बडिशेप फोडणीस घालावी. नंतर कांदा परतून घ्यावा. तो परतत असतांनाच मिरची घालावी. कांदा मिरची परतली गेल्यावर किसलेलं पनीर घालून ते चांगलं परतून घ्यावं. पनीर परतल्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ, धने पावडर, गरम मसाला आणि तिखट घालून मिश्रण पुन्हा चांगलं एकत्र करुन घ्यावं. नंतर यात कसूरी मेथी घालून मिश्रण पुन्हा हलवून घ्यावं. गॅस बंद करुन सारण थंड होवू द्यावं.

Image: Google

सारण गार झाल्यावर कचोरी करण्यास घ्याव्यात. यासाठी पारीच्या पिठाची छोटी लाटी घेऊन ती हातानंच थोडी मोठी करावी. त्यात सारण भरावं. ती व्यवस्थित बंद करुन हलक्या हातानं लाटावी. कचोरी फार पातळ लाटू नये. ती मध्यम जाडसरच ठेवावी. कचोरी तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावं. मध्यम आचेवर कचोऱ्या सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्याव्यात. चिंच पुदिन्याच्या चटपटीत चटणीसोबत खुसखुशीत पनीर कचोरी छान लागते. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.