Garlic Chutney Recipe: पोळी, भात, भाजी किंवा वरण अशा रोजच्या जेवणासोबत अनेकांना काहीतरी तोंडी लावायला हवं असतं. काही लोक लोणचं खातात तर काही लोक रोज ठेचा खातात. आपल्याला सुद्धा रोज जेवणासोबत असंच काही खायला हवं असेल तर आपल्यासाठी एक खास चटणी रेसिपी घेऊन आलो आहोत. बाजारात मिळणाऱ्या पॅकेटमधील चटण्यांपेक्षा ही घरी बनवलेली लसणाची खास चटणी (Garlic Chutney) आपल्या जेवणाचा आनंद नक्कीच वाढवेल.
मुंबई स्टाइल लसणाची चटणी नेहमीच चर्चेचा विषय असते. मुंबई स्टाइल लसणाच्या चटणीची टेस्ट तर चांगली असतेच, सोबतच ही चटणी अनेक दिवस स्टोर केली जाते. एकदा ही चटणी बनवून अनेक आठवडे स्टोर केली जाऊ शकते. ही चटणी चटपटीत लागते आणि थोडी तिखटही असते. महत्वाची बाब म्हणजे ही चटणी आपण स्नॅक्ससोबतही खाऊ शकता. ही लसणाची खास चटणी बनवण्यासाठी फार जास्त मेहनत घेण्याचीही गरज नाही.
चटणीसाठीचं साहित्य
लसणाच्या सोललेल्या कळ्या, किसलेलं खोबरं, वाळलेल्या लाल मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, भाजलेलं जिरं, 1 चमचा तीळ, टेस्टनुसार मीठ.
कशी बनवाल चटणी?
सगळ्यात आधी लोखंडी कढईत मिरच्या भाजून घ्या. नंतर शेंगदाणे भाजा, त्यानंतर तीळ आणि खोबरं भाजा. नंतर लसणाच्या कळ्या सोलून मिक्सरमध्ये घाला, त्यात भाजलेल्या सगळ्या गोष्टी टाका. थोडं जाडसर बारीक करा. हवं तर यात थोडं तेलही घालू शकता. आपली चटपटीत आणि तिखट अशी टेस्टी चटणी तयार आहे.