बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात कोणतीच भाजी नसते. अशावेळी काय करावं असा प्रश्न पडतोच.. नेहमीचं पिठलं किंवा मग कांदा- टाेमॅटो, कांदा- बटाटा अशा भाज्या वारंवार खाऊनही कंटाळा येतोच.. म्हणूनच अशावेळी एकदा खान्देशी डुबूक वड्यांचा बेत करून पाहा. हा तिथला एक पारंपरिक पदार्थ असून खान्देशात तो अतिशय आवडीने खाल्ला जातो. ही भाजी करायला अगदी सोपी असून जेवणाला मस्त रंगत आणणारी आहे.(Khandeshi Dubuk Vade Traditional Recipe)
खान्देशी डुबूक वडे रेसिपी
साहित्य
दोन मोठे कांदे
अर्धी खोबऱ्याची वाटी
२ ते ३ इंच आलं
१० ते १२ लसणाच्या पाकळ्या
८ ते १० कडीपत्त्याची पाने
१ टेबलस्पून तेल
चवीनुसार मीठ लाल, तिखट, गरम मसाला
१ वाटी बेसन पीठ
कृती
ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी कांदे उभे कापून घ्या आणि खोबऱ्याचेही काप करा. यानंतर गॅसवर कढई ठेवून कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घ्या.. भाजून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये आलं, लसूण, कडिपत्ता घाला. खोबरं आणि कांदा थंड झाल्यानंतर सगळं मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक वाटून घ्या.
तोपर्यंत भजी करण्यासाठी भिजवतो तसं सरसरीत पीठ भिजवून घ्या. यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. तिच्यामध्ये तेल घालून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर तयार केलेलं वाटण त्यात घाला. त्यामध्ये तिखट, गरम मसाला, हळद, मीठ, कोथिंबीर घालून त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
यानंतर त्यात गरम पाणी घाला आणि पाण्याला उकळी येऊ द्या. आता आमटीला उकळी आल्यानंतर त्यात छोट्या छोट्या आकाराचे भजे तोडून टाका. हळूहळू भजे शिजतात. ते शिजले की गॅस बंद करा. खमंग डुबूक वडे आमटी तयार..
