उन्हाळा आला म्हणजे हिरव्यागार, आंबट - गोड चटपटीत कैरीचा सिझन...बाजारात कैऱ्या विकायला यायला लागल्या की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. यादरम्यान घराघरांत हमखास कैरीचे अनेक पदार्थ बनवले जातात. कैरीपासून बनणारे विविध पदार्थ आपल्या साध्या जेवणाची चव अनेक पटींनी वाढवतात. डाळ कैरी, पन्हे, लोणचं यासोबतच जेवणाची चव द्विगुणित करणारा एक पदार्थ म्हणजे 'कैरीचा ठेचा'. कैरीचा आंबटपणा आणि हिरव्या मिरचीचा तिखटपणा यांचा असा काही मेळ बसतो की, ताटात हा ठेचा असेल तर दोन घास जास्तच जातात. दरवेळी कैरीचं लोणचं खाण्यापेक्षा कैरीचा फ्रेश ठेचा खाणं केव्हाही उत्तम...(How To Make Kairicha Thacha At Home).
भाकरी, पोळी किंवा अगदी साध्या वरण-भातासोबतही कैरीचा ठेचा खूपच स्वादिष्ट लागतो. विशेष म्हणजे हा पदार्थ बनवायला अगदी सोपा असून कमी वेळात तयार होतो. जेव्हा घरात कोणतीही भाजी नसते किंवा जेवणात काहीतरी 'चटपटीत' हवंसं वाटतं, तेव्हा कैरीचा इन्स्टंट ठेचा तयार करु शकतो. गरमागरम भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत कैरीचा ठेचा म्हणजे रणरणत्या उन्हांतील सुख... कैरी, हिरवी मिरची, लसूण आणि थोडं मीठ... बस्स! इतक्या कमी साहित्यात तयार होणारा हा पदार्थ चवीला इतका भारी लागतो की तुम्ही भाजीची वाटही पाहणार नाही. पाच मिनिटांत तयार होणारा हा झणझणीत कैरीचा ठेचा तुमच्या साध्या जेवणाची (Kairicha Thacha Recipe) चव दुपटीने वाढवेल. कैरीच्या ठेच्याची सोपी पारंपरिक रेसिपी...
साहित्य :-
१. तेल - २ ते ३ टेबलस्पून
२. हिरव्या मिरच्या - ३ ते ४
३. लसूण पाकळ्या - ८ ते ९
४. जिरे - १ टेबलस्पून
५. हिंग - चिमूटभर
६. मीठ - चवीनुसार
७. शेंगदाणे - १ कप (हलकेच भाजून घेतलेले)
८. कैरीचा किस - १ कप
९. हळद - १ टेबलस्पून
१०. कोथिंबीर - १/२ कप
अस्सल सोलापुरी झणझणीत शेंगदाणा चटणी! साध्या जेवणालाही येईल रंगत - पारंपरिक झणझणीत चव...
आई - आजीच्या हातचं कैरीचे पन्हे कसे मस्त लागते, पाहा पारंपरिक चवीसाठी ७ सिक्रेट टिप्स...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एका पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे, हिंग व चवीनुसार मीठ घालावं.
२. त्यानंतर या मिश्रणात हलकेच भाजून घेतलेले आणि सालं काढलेले शेंगदाणे घालावेत. सगळे मिश्रण एकत्रित कालवून हलकेच भाजून घ्यावं.
३. कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्या किसणीवर किसून त्याचा किस तयार करून घ्यावा. कैरीचा किस एका बाऊलमध्ये घेऊन त्यात थोडी हळद घालूंन कालवून घ्यावे.
४. आपल्या आवडीनुसार खलबत्यात किंवा मिक्सरमध्ये भाजून घेतलेल मिश्रण घालून त्याची किंचित जाडसर भरड तयार करून घ्यावी. मग या मिश्रणात कोथिंबीर आणि हळद लावलेला कैरीचा किस घालावा आणि थोडे जाडसर ठेच्याप्रमाणे टेक्श्चर येईल असे कुटून घ्यावे.
चवीला मस्त आंबट - चिंबट, गोड - तिखट अशा जवळपास सगळ्याचं चवीचं मिश्रण असणारा कैरीचा खमंग ठेचा खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भाकरी, चपाती किंवा अगदी साध्या वरण - भातासोबत देखील हा ठेचा खायला अप्रतिम लागतो.
