थंडीच्या दिवसांत गरमागरम कढी पिण्याची मजा काही वेगळीच. हिवाळ्याच्या दिवसांत बऱ्याच घरांमध्ये ताकाची कढी केली जाते (Takachi Kadhi). कढी करण्यासाठी तुम्हाला काही खास करावं लागणार नाही. सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही परफेक्ट कढी बनवू शकता. कढी करण्याची सोपी रेसीपी पाहूया. यासाठी तुम्हाला स्वंयपाक घरात उपलब्ध असलेलं साहित्य लागेल. दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी भात किंवा चपातीसोबत खाण्यासाठी कढी उत्तम पर्याय आहे. कढीमुळे तोंडाला चव येण्यासही मदत होईल आणि जेवणाचा बेत उत्तम होईल. (How To Make Kadhi)
कढी करण्यासाठी लागणारं साहित्य
ताक: २ कप (आंबट ताक असेल तर उत्तम)
बेसन पीठ (हरभऱ्याचे पीठ): २ चमचे
पाणी: अर्धा कप (आवश्यकतेनुसार)
हिरवी मिरची: २ ते ३ (बारीक चिरलेल्या किंवा ठेचलेल्या)
आले-लसूण पेस्ट/ठेचा (ऐच्छिक): अर्धा चमचा
कढीपत्ता: ७-८ पाने
मोहरी: अर्धा चमचा
जिरे: अर्धा चमचा
हिंग: पाव चमचा
हळद: पाव चमचा
तेल: १ ते २ चमचे
मीठ: चवीनुसार
साखर (ऐच्छिक): अर्धा चमचा
कोथिंबीर: बारीक चिरलेली (सजावटीसाठी)
कढी करण्याची सोपी कृती
कढीचे मिश्रण तयार करणे: एका भांड्यात ताक घ्या. त्यात बेसन पीठ आणि हळद घालून गुठळ्या न राहता व्यवस्थित मिक्स करा. गरज वाटल्यास थोडे पाणी घाला. हे मिश्रण बाजूला ठेवा.
फोडणी तयार करणे: एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यावर जिरे, हिंग, कढीपत्ता आणि चिरलेली मिरची/ठेचा घालून परतून घ्या. आले-लसूण पेस्ट वापरत असल्यास ती सुद्धा घाला.
कढी शिजवणे: तयार फोडणीत हळदी-बेसन मिसळलेले ताकाचे मिश्रण हळू हळू ओता. लगेच मीठ आणि साखर घाला.
सतत ढवळा: कढी फुटू नये म्हणून हे मिश्रण गॅसच्या मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. मिश्रण उकळीला येईपर्यंत ढवळणे थांबवू नका.
उकळी आणि सर्व्ह करणे: कढीला चांगली उकळी आली आणि ती थोडी दाट झाली की गॅस बंद करा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा.
