आजकाल अनेक पदार्थांमध्ये चीजचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पिझ्झा, सँडविच, पास्ता किंवा विविध स्नॅक्समध्ये चीजमुळे चव अधिकच वाढते. मात्र बाजारात मिळणारे चीज अनेकदा महाग असते किंवा त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्ज असण्याची शक्यता असते. त्यामुळेच अनेक गृहिणींना घरच्याघरीच ताजे आणि शुद्ध चीज तयार करण्याची इच्छा असते. खरंतर, घरच्याघरी चीज बनवणे अजिबात अवघड नाही. अगदी काही घरातच उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने आणि सोप्या पद्धतीने आपण मऊ, ताजे आणि चविष्ट चीज तयार करू शकतो. घरगुती चीज केवळ आरोग्यदायीच नसते, तर त्याची चवही खूप छान लागते(how to make homemade cheese slice).
पिझ्झा असो वा पास्ता, चीजचे नाव काढले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. अगदी विकतसारखेच क्रीमी आणि चविष्ट चीज घरीच, तेही फक्त घरगुती पदार्थांतून बनवता आल तर किती बरं होईल, असं अनेकींना वाटत... स्वयंपाकघरातील मोजक्या साहित्याचा वापर करून तुम्ही अगदी १० ते १५ मिनिटांत मऊ, क्रीमी आणि लवचिक चीज तयार करू शकता. पैशांची बचत आणि चवीची खात्री देणारी ही घरगुती चीजची रेसिपी नक्की काय आहे ते पाहा... घरच्याघरीच स्वादिष्ट आणि हेल्दी चीज (homemade cheese slices recipe) तयार करण्याची हटके रेसिपी...
साहित्य :-
१. फुल्ल फॅट दूध - १/२ लिटर
२. व्हिनेगर - २ ते ३ टेबलस्पून
३. पाणी - १ कप
४. मीठ - चवीनुसार
५. अगर - अगर पावडर - १/२ टेबलस्पून
जिम - डाएट करूनही वजन कमीच होत नाही? मग स्वयंपाकाची ‘अशी’ रीत बदला, वजन घटायला लागेल झरझर...
कृती :-
१. एका मोठ्या पसरट, खोलगट भांड्यात दूध ओतून ते चमच्याने हलवून गरम करून घ्यावं.
२. दूध व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस बंद करून त्यात व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणांत घेऊन हे एकत्रित केलेलं मिश्रण कोमट दुधात थोडे - थोडे घालून चमच्याने सतत हलवत राहून दूध फाडून घ्यावं. मग झाकून ५ ते १० मिनिटे तसेच ठेवून द्यावे.
३. दूध पूर्णपणे फाटल्यावर ते एका गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावं. गाळून तयार झालेलं पनीर पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्यावं.
४. मिक्सरच्या भांड्यात तयार झालेल पनीर आणि पनीर तयार करतानाच थोडंसं पाणी घालून एकत्रित फिरवून पातळ आणि क्रिमी अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
५. मिक्सरमधील मिश्रण एका पॅनमध्ये घेऊन ते ५ ते १० मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे. या मिश्रणात आपण चवीनुसार मीठ, अगर - अगर पावडर आणि मिश्रण घट्ट झाल्यास थोडंस दूध गरजेनुसार घालावं.
६. तयार मिश्रण एका ताटात पसरवून किंवा चौकोनी पृष्ठभागाच्या डब्यांत भरून एक पातळसर थर तयार करावा. मग हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यावं. थंड झाल्यावर १० ते १५ मिनिटे फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावं. १५ मिनिटांनी फ्रिजमधून काढून सुरीच्या मदतीने त्याचे चौकीनी स्लाईस पाडून घ्यावेत.
फाटलेल्या दुधापासून घरच्याघरीच तयार केलेल घरगुती चीज खाण्यासाठी तयार आहे.
