Join us

सर्दी-कफ झाला तर घरच्याघरी १० मिनिटांत करा आलं- मधाची गोळी, खवखवणारा घसा होईल बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2023 15:27 IST

How To Make Ginger Honey Drops at Home : प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया ही गोळी कशी तयार करायची याची रेसिपी सांगतात, पाहूय़ा

ठळक मुद्देया गोळ्या अगदी बाजारात मिळणाऱ्या गोळ्यांसारख्या लागतात आणि जाता-येता आपण त्या खाऊ शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारी हेल्दी रेसिपी...

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आणि सर्दी-कफाच्या रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ झाली. वातावरणात बदल झाले की शरीराला त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आपल्यामध्ये काही बदल करावे लागतात. हे बदल म्हणजेच सर्दी-खोकला, म्हणूनच लहान मुलांना वातावरण बदलताना सर्दी झालेली चांगली असं डॉक्टरांचे म्हणणे असते. काहीवेळा घसा खवखवणे, नाक सर्दीने बंद होणे, कोरडा खोकला आणि कफ असं सगळं झालं की आपल्याला अस्वस्थ व्हायला होतं (How To Make Ginger Honey Drops at Home). 

नीट श्वास घेता आला नाही किंवा सर्दीने डोकं पॅक झाले असेल तर काहीच काम सुचत नाही. अशावेळी आपण कफ सिरप आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एखादी चघळायची गोळी खातो. बाजारात मिळणाऱ्या या गोळ्यांप्रमाणेच घरच्या घरी अगदी १० मिनीटांत आलं-मधाची गोळी करता येते. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून ही गोळी होत असल्याने लहान मुलांनाही आपण ती आवर्जून देऊ शकतो. प्रसिद्ध शेफ पंकज भदौरीया ही गोळी कशी तयार करायची याची रेसिपी सांगतात, पाहूया..

(Image : Google)

साहित्य - 

१. आल्याचा किस - अर्धी वाटी

२. साखर - अर्धी वाटी 

३. मध - २ चमचे

४. लिंबाचा रस - १ चमचा

५. तूप - अर्धा चमचा 

कृती -

१. आलं स्वच्छ धुवून किसून घ्या.

२. नंतर हा कीस गाळणीतून गाळून त्याचा रस तयार करा. 

३. कढईमध्ये अर्धी वाटी साखर घालून ती गरम करा, म्हणजे त्याचे कॅरेमल होईल.

४. साखर पूर्ण पातळ झाली की गॅस बंद करुन त्यामध्ये आल्याचा रस, मध घाला.

५. यामध्ये १ चमचा लिंबाचा रस घालून हे मिश्रण चांगले एकजीव करा.

६. एका ताटलीला तूप लावून त्यावर या मिश्रणाचे ड्रॉप्स सोडा.

७. वाळल्यानंतर याच्या गोळ्या तयार होतील त्या प्लास्टीकमध्ये रॅप करुन ठेवून द्या.

८. घरच्या घरी तयार केलेल्या या गोळ्या अगदी बाजारात मिळणाऱ्या गोळ्यांसारख्या लागतात आणि जाता-येता आपण त्या खाऊ शकतो. त्यामुळे घशाला पटकन आराम मिळण्यास मदत होते. 

टॅग्स :अन्नआरोग्यपाककृती