बाजारात अनेक नवीन ब्रँडचे तूप पाहायला मिळते. शुद्ध तुपाच्या नावाखाली अनेकदा भेसळही होते. भारतीय स्वयंपाकघरात साजूक तुपाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.(Homemade ghee recipe) वरण-भातावर तुपाची धार, साजूक तुपातला शिरा किंवा उकडीच्या मोदकावर तूप, तुपाशिवाय जेवणाची चव अपूर्णच. आजही कित्येक घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने दुधावरची साय साठवून साजूक तूप तयार केले जाते. (How to make ghee from cream)
घरच्या घरी साजूक तूप तयार करण्याची पद्धत थोडी वेळखाऊ, किचकट असली तरी घरच्या तुपासारखे दुसरे काहीच नाही. जर आपल्यालाही घरच्या घरी तूप बनवायचे असेल तर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (Desi ghee making trick)
घरी तूप बनवण्यासाठी आपल्याला एका मोठ्या भांड्यात साय ७ ते ८ दिवस साठवावी लागेल. पुरेशी साय जमा झाल्यानंतर त्यात कोमट किंवा थंड पाणी घालून ब्लेंडर फिरवून घ्या. याच्यावर आपल्याला तेल तरंगताना दिसेल. बटरचा गोळा वर आल्यानंतर थंड पाण्याने दोन वेळा धुवा. आता एक जाड पॅन घेऊन मंद आचेवर बटर गरम करा. ५ ते ६ मिनिटे शिजवल्यानंतर फेस यायला सुरुवात होईल. हळूहळू तूप आपल्याला दिसेल.
आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण थेट पॅनमध्ये साय गरम करु शकतो. फक्त मंद आचेवर आपल्याला सतत ढवळत राहावी लागेल. उकळी आल्यानंतर त्यात मीठ किंवा लिंबाचा रस घाला. ज्यामुळे तूप वर येईल आणि बेरी खाली जमा होईल.
तूप पूर्ण तयार होण्यापूर्वी त्यात २-३ लवंगा किंवा विड्याचे एक पान घाला. यामुळे तुपाला अप्रतिम सुगंध येतो आणि ते वर्षभर टिकते. तूप दाणेदार व्हावे असे वाटत असेल, तर गॅस बंद करण्यापूर्वी त्यावर पाण्याचा एक हलका शिंतोडा मारा. यामुळे तुपाचा कण आणि कण फुलून येतो.
