बऱ्याचदा असं होतं की भात खाल्लाच जात नाही आणि मग तो उरतो. आता भात उरला की मग त्याला फोडणी घालून खायची ही आपली पारंपरिक पद्धत. फोडणीचा भात तसा अनेकांचा आवडीचा. पण नेहमी त्याच त्या चवीचा फोडणीचा भात खाण्याचाही कंटाळा येतोच.. म्हणूनच अशावेळी ही एक मस्त रेसिपी ट्राय करा. सकाळी उरलेला भात रात्री किंवा रात्री उरलेला भात दुसऱ्यादिवशी सकाळी नाश्त्यासाठी असा तुम्ही वापरू शकता. खूप शिळा भात वापरू नये. कारण तो आरोग्यासाठी चांगलाही नसतोच. उरलेल्या भातापासून तयार झालेले डोसे किंवा उत्तप्पे मुलांनाही खूप आवडतील. कधी कधी मुलांना एकदम डोसा, उत्तप्पा खाण्याची लहर येते (how to make dosa, uttappa from leftover rice?). अशावेळी त्यांना पुढील रेसिपी वापरून अगदी झटपट डोसेही करून देता येतील...(simple recipe of making dosa and uttappa from basi chawal)
उरलेल्या भातापासून डोसा, उत्तप्पा करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी उरलेला भात
अर्धी वाटी रवा
अर्धी वाटी दही
चवीनुसार मीठ आणि चिमूटभर बेकिंग सोडा
उत्तप्पा करायचा असल्यास कांदा, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर आणि तुमच्या आवडीच्या इतर भाज्या.
कृती
उरलेल्या भाताचा डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला भात, रवा, दही आणि मीठ घाला. सगळं मिश्रण अगदी बारीक वाटून घ्या.
यानंतर वाटून घेतलेलं पीठ एका भांड्यामध्ये काढा. त्यामध्ये गरज वाटल्यास थोडं पाणी घाला आणि नेहमी डोसे करताना जसं पीठ असतं तसं सरसरीत पीठ करून घ्या. यानंतर सगळ्यात शेवटी त्यामध्ये बेकिंग सोडा घालून पीठ हलवून घ्या.
आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा आणि तेल लावून नेहमी करतो तसे डोसे करा. जर तुम्हाला या पिठाचे उत्तप्पे करायचे असतील तर त्यात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, हिरव्या मिरच्या यांच्यासोबतच तुम्हाला आवडतील त्या इतर भाज्याही घाला. मस्त चवदार, जाळीदार डोसे, उत्तप्पे तयार..
