दिवाळीचा फराळ, गाेडाधोडाचे पदार्थ खाल्ल्यानंतर अनेकांना काहीतरी खमंग, चटकदार, चटपटीत असं खावंसं वाटतं. असं जर खावं वाटत असेल तर डाळ बट्टी किंवा डाळ बाटी हा एक चांगला पदार्थ आहे. आंबट गोड वरणामध्ये भरपूर तूप घातलेली खमंग बट्टी कुस्करून ती गरमागरम खाणं हे एक वेगळंच सूख. शिवाय बट्टी असेल तर त्यासोबत झणझणीत ठेचा आणि तोंडी लावायला कांदाही असतोच.. आता बट्टी घरी तयार करणं अनेकींना खूप अवघड वाटतं. म्हणूनच आता ही एक अतिशय सोपी पद्धत पाहा आणि घरच्याघरी डाळ बट्टी तयार करा..(how to make dal batti from wheat atta?)
गव्हाच्या पिठापासून बट्टी कशी तयार करायची?
बट्टी किंवा बाटी तयार करण्यासाठी मक्याचं पीठ अनेक ठिकाणी वापरण्यात येतं. पण प्रत्येकवेळी ते पीठ घरात असतंच असं नाही. म्हणूनच आपल्या घरात नेहमीच असणारी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ वापरून बट्टी कशी तयार करायची ते पाहूया..
सोहा अली खानने शेअर केल्या ब्यूटी टिप्स- किचनमधल्या 'या' पिठाचा फेसपॅक खुलवतो तिचं सौंदर्य
साहित्य
दिड वाटी गव्हाचं पीठ
अर्धी वाटी रवा
अर्धा टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
१ टेबलस्पून तेल
कृती
सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून घ्या. त्यात मीठ घाला. त्यानंतर एका वाटीमध्ये तेल थोडं गरम करून घ्या.
गरम झालेलं तेल गव्हाच्या पिठामध्ये घाला आणि हाताने पीठ व्यवस्थित हलवून घ्या. तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जाईल या पद्धतीने हाताने पीठ व्यवस्थित हलवून घ्या.
तुपापासून घरीच तयार करा मॉईश्चरायजर- बघा सोपी पद्धत, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही
यानंतर त्या पिठामध्ये बेकिंग सोडा घाला आणि गरम पाणी घालून पीठ थोडं घट्ट मळून घ्या. यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडासा ओवाही घालू शकता. पीठ मळून घेतल्यानंतर त्याला तेल लावा आणि १० मिनिटे ते झाकून ठेवा. यानंतर इडली पात्रामध्ये पिठाचे गोळे करून ठेवा आणि १० मिनिटे वाफवून घ्या. हे गोळे थंड झाल्यानंतर ते कापून घ्या आणि तळून घ्या. खुसखुशीत खमंग बट्टी तयार..
